वायफायसेवेची परस्पर केली विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:59 AM2019-11-13T00:59:19+5:302019-11-13T00:59:23+5:30
एकीकडे महासभेत शहरातील मोफत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा वादात सापडला असतांना आता शहरातील महापालिकेची महत्त्वाकांक्षी वायफाय सेवाही वादात सापडली आहे.
ठाणे : एकीकडे महासभेत शहरातील मोफत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा वादात सापडला असतांना आता शहरातील महापालिकेची महत्त्वाकांक्षी वायफाय सेवाही वादात सापडली आहे. ज्या इन्टेक वायफाय कंपनीला हे काम दिले आहे, ती महापालिकेच्या याच सेवेवरून इतर कंपन्यांना इंटरनेटचे कनेक्शन विकत असल्याचा धक्कादायक आरोप सोमवारच्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
मोफत वायफाय सेवा देणाºया संबंधित कंपनी परस्पर कनेक्शन विकून लाखो रुपये कमवत असल्याचा खळबळजनक आरोप करून भाजपच्या नगरसेवकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली. यावर येत्या १५ दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करून त्यानंतर कारवाई नियोजित करण्यात येईल, अशी माहिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिली.
डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील सर्व रस्ते वायफायशी जोडले असून पुढील १० वर्षे ही सेवा कार्यरत असणार आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी ठाणे सिटी फ्री वायफाय या नावाने सुरू केलेले वायफाय वापरता येणार आहे. नागरिकांना आपल्या मोबाइल मध्ये लॉगीन करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या सेवेमध्ये ८०० केबीपीएस स्पीडने अमर्यादीत फ्री वाय फाय वापरता येणार आहे. ज्या नागरिकांना ८०० केबीपीएस स्पीड पेक्षाही जास्त स्पीडने ही सेवा हवी आहे, त्यांना मात्र अधिक मूल्य देवून माफक दरात ५० केबीपीएस स्पीडने ती वापरता येणार आहे.
या वायफाय सेवेमध्ये १० रु पये पासून ते ४०० रुपये पर्यत प्लॅन आहेत. यामध्ये १० रुपयात २ जीबी डाटा १ दिवस, तर ४०० रुपयात ४०० जीबी ५६ दिवसाकरिता ही सेवा वापरता येणार आहे.
>इन्टेक वायफाय कंपनीवर होणार कारवाई
आता ही सेवा वादात सापडला आहे. ज्या इन्टेक वायफाय कंपनीला हे काम दिले आहे तिने ठाणेकरांना ही सेवा मोफत द्यायची आहे. यामध्ये पालिकेच्या सर्व कार्यालयांनादेखील ही सेवा मोफत देण्यात आली आहे.त्याबदल्यात एखाद्या ग्राहकाला ८०० केबीपीएस स्पीड पेक्षाही जास्त स्पीड ने वायफाय ची सेवा हवी आहे. त्यांना मात्र अधिक मूल्य देवून माफक दारात ५० केबीपीएस स्पीडने ही सेवा वापरता येणार आहे. तेवढेच उत्पन्न तिला मिळणार आहे. मात्र, इन्टेक वायफाय कंपनी पालिकेला विश्वासात न घेता परस्पर कनेक्शन विकत असून त्याबदल्यात लाखो रु पये कमावत असून महापालिकेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे आणि भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी सभागृहात केल्याने ही योजनाच आता अडचणीत आली आहे.
>त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबधींत इन्टेक वायफाय कंपनीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. त्यानुसार आता येत्या १५ दिवसांत याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिले.