माझा करार भाजपाशी, पाचही वर्षे सत्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:33 AM2018-04-25T05:33:17+5:302018-04-25T05:33:17+5:30
इदनानी यांचा दावा : शिवसेनेच्याही अपेक्षा
उल्हासनगर : ओमी टीमशी पटत नसल्याने भाजपाने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याने पुढील काळात साई पक्ष या सत्तेत असेल की नाही, याबाबत तर्क लढवले जात आहेत. मात्र साई पक्षाचा भाजपासोबत करारनामा झाला आहे. मी इतरांना ओळखत नाही, एवढीच सावध प्रतिक्रिया पक्षप्रमुख जीवन इदनानी यांनी दिली. त्याचवेळी सत्तांतरापूर्वी शिवसेनेचे सत्तेतील स्थान काय, हे आधी ठरवावे लागेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर महापालिकेतील भाजपाच्या सत्तेत जशी ओमी टीम होती. तसाच साई पक्षही आहे. या सत्तेला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच साई पक्षाने शहर विकासाचा प्रश्न उपस्थित करून सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यामुले त्या पक्षाची समजूत काढण्यासाठी आणि सत्ता वाचविण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना थेट मुख्यमंत्र्याची भेट घालून दिली. साई पक्षाचे बंड थंड होत नाही, तोच ओमी टीममधील नाराजी बाहेर पडली. त्याचीच परिणती भाजपा-शिवसेनेच्या युतीत झाली.
कल्याण- डोंबिवलीतील महापौरपदाची निवडणूक पार पडताच उल्हासनगरात सत्तांतर होईल, अशी स्पष्ट कल्पना भाजपाच्या नेत्यांनी दिल्याने ओमी टीममध्ये अस्वस्थता पसरली. साई पक्षाच्याही अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच साई पक्षाने सावध पवित्रा घेत भाजपासोबत करार झाला आहे. त्यामुळे आम्ही इतर पक्षांना ओळखत नाही. आम्ही पाचही वर्षे सत्तेत असू, असे सांगत शिवसेनेबाबत भाष्य करण्यास नकार दिला. पालिकेतील सत्तांतरापूर्वी सत्तेतील शिवसेनेचे स्थान ठरवावे लागेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चद्रंकात बोडारे यांनी व्यक्त केली.
ओमी-टीम वेगवेगळी
भाजपासोबत महाआघाडी केल्यानंतर ओमी कलानी यांच्या टीमच्या सदस्यांना त्या पक्षाने भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे ते सध्या भाजपाचे नगरसेवक आहेत. त्यांना पक्षाचा व्हिप लागू होतो. त्यामुळे ओमी यांच्याकडे अधिकृतपणे एकही नगरसेवक नाही. स्वत: पंचम कलानी याही भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्याने त्याही भाजपाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे ओमी आणि त्यांची टीम वेगवेगळी झाली आहे.