माझे कुटुंब... मोहिमेसाठीही ठाण्यात शिक्षकांकडून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:29 AM2020-09-21T00:29:56+5:302020-09-21T00:30:05+5:30
संतप्त भावना : अध्यादेशात शिक्षकांचा उल्लेख नाही, कार्यमुक्त करण्याची मागणी
स्रेहा पावसकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एप्रिलपासून सुरू झालेले कोविड सर्वेक्षणाचे काम अपुऱ्या सोयीसुविधा असतानाही शिक्षक अद्याप करत आहेत. त्यातच नव्याने सुरू झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठीही ठाणे महापालिका शिक्षकांनाच काम करायला लावत आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार यात शिक्षकांचा उल्लेखच नाही, तरीही ठाणे महापालिका मात्र आमच्याकडून काम करून घेऊन अन्याय करत आहे, अशा भावना ठाण्यातील संतप्त शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.
महापालिका आणि नंतर खाजगी शाळेच्या शिक्षकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम दिले होते. वाहतुकीची सोय नसताना जीवावर उदार होत शिक्षकांनी ते सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करणाºया शिक्षकांची कोविड चाचणीही केली नाही. दरम्यान, ठाण्यातील ७0 ते ८0 शिक्षक कोरोना पॉझिटिव्हसुद्धा झाले. तर, चार ते पाच शिक्षकांचा विविध कारणांनी मृत्यूही झाला. अन्य महापालिकांनी आपल्या सर्व शिक्षकांची या कामातून मुक्तता केली, पण ठाणे महापालिकेने मात्र ५५ वर्षांवरील आणि आजारी असणाºया शिक्षकांनाच या कामातून वगळले. उर्वरित शिक्षक हे काम करतच आहेत. आता शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम नव्याने सुरू झाली आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार या मोहिमेसाठी गृहभेटी देणाºया पथकात एक आरोग्य कर्मचारी व दोन स्थानिक स्वयंसेवक असणे गरजेचे आहे. मात्र, ठाणे महापालिका हद्दीत या मोहिमेसाठीही शिक्षकांचाच वापर केला जात आहे. शिक्षकांकडून करवून घेतल्या जाणाºया या अतिरिक्त कामामुळे त्यांच्या शालेय कामकाजावर परिणाम होत आहे. मात्र, तरीही शिक्षकांकडून हे काम करवून घेतले जात आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. इतर महापालिकांप्रमाणे ठाणे महापालिकेनेही शिक्षकांची या कामातून मुक्तता करावी, अशी मागणी शिक्षकवर्ग सातत्याने करत आहे.
ठाण्यातील महापालिका आणि खाजगी शाळांचे मिळून अजूनही हजार ते बाराशे शिक्षक या सर्वेक्षणाच्या कामात अडकलेले आहेत. नव्या मोहिमेत शिक्षकांचा उल्लेखही नसताना ठाणे महानगरपालिका त्यांचा वापर करून घेत आहे. हे चुकीचे आहे. आमच्या उर्वरित सर्व शिक्षकांना तत्काळ या सर्व कामातून मुक्त करावे.
- ज्ञानेश्वर परदेशी, अध्यक्ष,
ठाणे महानगरपालिका
प्राथमिक शिक्षकसेना
महापालिका शाळांचे शिक्षक हेदेखील महापालिकेचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे नव्या मोहिमेचे शिक्षकांना काम दिले आहे. मात्र, शिक्षकांना या कामातून कधी पूर्ण मुक्त केले जाईल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील अधिकारीच घेतील. तेच याबाबत सांगू शकतील.
- राजेश कंकाळ,
शिक्षणाधिकारी, ठाणे महानगरपालिका