ठाण्यात 'माझं कुटुंब, माझी जाहिरातबाजी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:22+5:302021-05-29T04:29:22+5:30

ठाणे : आयजीच्या जीवावर बायजी उदार, बायकोच्या पदावर नवरा सुभेदार ! अशी नवीन म्हण ठाण्यात बोलली जात आहे. कारणही ...

'My family, my advertising' in Thane | ठाण्यात 'माझं कुटुंब, माझी जाहिरातबाजी'

ठाण्यात 'माझं कुटुंब, माझी जाहिरातबाजी'

Next

ठाणे : आयजीच्या जीवावर बायजी उदार, बायकोच्या पदावर नवरा सुभेदार ! अशी नवीन म्हण ठाण्यात बोलली जात आहे. कारणही तसंच आहे. मतदारसंघाच्या आरक्षणामुळे ज्यांना आपल्या बायकांना निवडणूक लढवायला लागली, त्या सर्व नगरसेविकांचे नवरोबा आपणच नगरसेवक असल्याच्या थाटात फिरताना दिसतात. येथवर ठीक होतं. मात्र आता जणू आपण या नगराचे मालक असल्याच्या थाटात नगराच्या प्रवेशद्वारावर जनतेच्या पैशांवर बॅनरबाजी करण्याची नवी टूम ठाण्यात आली आहे.

कोरोना काळात एकीकडे मुख्यमंत्री 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' अशी भावनिक साद घालून नागरिकांना सुरक्षेचे आवाहन करत असताना ठाणे शहरातील त्यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी 'माझं कुटुंब, माझी जाहिरातबाजी' अशा पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या जीवावर आपल्या राजकीय भवितव्याची काळजी घेण्याकरिता आपल्या बॅनरवर डिजिटल छबी झळकवत जोरदार जाहिरातबाजी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक पाच आणि सातमधील शिवसेना नगरसेविकांच्या पतीचे फोटो या डिजिटल बॅनरवर दिसत असून, जनतेच्या कररूपी पैशांवर सुरू असलेली ही चमकेशगिरी तत्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह या भागातील सामाजिक संघटनांनी केली. ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरू असल्याचे उघड झाले आहे. प्रभाग क्र. ५मध्ये संस्कार पब्लिक शाळेजवळील शिवाईनगर येथील स्वागताचा बोर्ड व प्रभाग क्र. ७ मध्ये वर्तकनगरात डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत. या फलकांवर वर्तकनगर येथे शिवसेना नगरसेविका राधिका फाटक यांचे पती राजेंद्र फाटक आणि शिवाईनगरात शिवसेनेच्या नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचे पती भास्कर बैरीशेट्टी यांची छबी झळकली आहे. नगरसेविकेचे पती हे कोणत्याही प्रशासकीय हुद्द्यावर अथवा स्वत: नगरसेवक नाहीत. त्यांचा फाेटो कोणत्या हेतूने लावला. यामागे येत्या निवडणुकीत निव्वळ राजकीय स्वार्थ साधणे हा हेतू आहे, असा प्रश्न मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांना केला. मनविसे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी या बॅनरबाजीला आक्षेप घेतला आहे.

.......

वाचली

Web Title: 'My family, my advertising' in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.