‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:12 AM2020-09-20T01:12:37+5:302020-09-20T01:12:46+5:30

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती

The 'My Family, My Responsibility' campaign will hit rural areas | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. मात्र, या अभियानाचे काम करण्यास राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नकार दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे, अशी माहिती येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागात हे अभियान फसल्यात जमा असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
या अभियानातील पथकामधील अंगणवाडी कार्यकर्तीने दररोज ५० घरांना भेटी देऊन तापाची तपासणी करणे, गरज पडल्यास इतर सुविधा देणे याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रोकोविड, कोविड व पोस्टकोविड आदींचे मार्गदर्शन करावयाचे सूचित केले आहे.
सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या अभियानाचे काम करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे रोजचे नियमित आहारवाटप, लसीकरण, वजन घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो, माहिती अपलोड करणे आणि दहा दिवस पोषण महिना साजरा करणे आदी कामे करावी लागणार आहेत. याशिवाय सॅम या कुपोषित बालकांच्या घरी प्राधान्याने भेटी द्याव्या लागणार आहेत. पण अंगणवाडी कर्मचारी या माणूस आहेत, रोबोट नाहीत, त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना वेळ द्यावाच लागतो. याकडे महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

दैनंदिन काम सांभाळून १२ तास तपासणी कशी करणार?
अंगणवाडी सेविकांत ५० ते ५५ वयोगटातील संख्या मोठी आहे. ब्लडप्रेशर, मधुमेहाने त्या त्रस्तही असू शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी, सौम्य झालेली असू शकते. त्यांना या अभियानाद्वारे रोज ५० गृहभेटींना पाठवून कसे चालेल? इतर सर्व विभागांनी ५५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना कोविडसंबंधी कामांतून वगळलेले आहे. मग महिला बालकल्याण विभाग याचा विचार करणार की नाही? अंगणवाडी सेविकांना ५० गृहभेटी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका गृहभेटीसाठी सुमारे २० मिनिटे म्हणजेच ५० गृहभेटी पूर्ण करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. म्हणजे, त्यांना नित्याचे काम व पोषण आहाराचे काम सांभाळून, सुमारे १० ते १२ तास विनामूल्य काम करावे लागेल, त्यामुळे या अभियानाचे काम करणे हे त्यांच्यासाठी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

५० घरांना भेटी दिल्यानंतर बालकांना संसर्गाची भीती
कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कंटेनमेंट झोन रोज वाढत आहेत, अशा कठीण जोखमीच्या अवस्थेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५० घरांना भेटी दिल्यावर पुन्हा अंगणवाडीत नियमित कामे करावयाची म्हटले तर छोटी मुले, गरोदर व स्तनदा माता या अतिसंवेदनशील गटात त्यांना मिसळावे लागेल. जर या गटाला अंगणवाडी कर्मचाºयांमुळे संसर्ग लागलाच तर जबाबदार कोण? स्थानिक जनतेच्या रोषाचा पहिला बळी अंगणवाडी कर्मचारी ठरतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The 'My Family, My Responsibility' campaign will hit rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.