'कला, माणूसपणाच्या प्रवासात माझे पाय जमिनीवरच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:17 AM2018-10-30T00:17:19+5:302018-10-30T00:17:29+5:30

डोंबिवलीत ‘चतुरंग’च्या कार्यक्रमात संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्यासोबत रंगल्या दिलखुलास गप्पागोष्टी

'My feet on the journey of art, manhood on the ground' | 'कला, माणूसपणाच्या प्रवासात माझे पाय जमिनीवरच'

'कला, माणूसपणाच्या प्रवासात माझे पाय जमिनीवरच'

Next

डोंबिवली : एखाद्या कलाकाराची कलाकृती गाजते, तेव्हा त्याला प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतात. त्याच कलाकाराचा आयुष्यातील उत्तरार्ध हा कधीकधी वाईट असतो. कला उत्तुंग होते, तेव्हा माणूस म्हणून आपणही उत्तुंग व्हावे. हा समांतर प्रवास करताना मी माझे पाय जमिनीत घट्ट रोवले आहेत, असे मत नृत्य, निवेदन, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेली रंगयात्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा रसिकांसोबत दिलखुलास गप्पागोष्टींचा कार्यक्रम शनिवारी सुयोग मंगल कार्यालयात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. संपदा म्हणाल्या, ‘प्रत्येक क्षेत्रात समोरच्या व्यक्तीशी आदर ठेवून वागा. आपले अस्तित्व कधी दाखवावे, हे मी ‘आॅल द बेस्ट’ या नाटकापासून शिकले. या नाटकाच्या वेळी एका प्रेक्षकाने आगाऊपणे दाद दिली होती. त्याला मी तेथेच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या क्षेत्रातील पुढील प्रवास खूपच चांगला झाला. मुलींनी ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या तेथेच रोखल्या पाहिजेत. आपली आब आपणच राखली पाहिजे. या क्षेत्रात सौंदर्याला महत्त्व आहे. त्याला चांगल्या शब्दांत प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘कलाकाराला पडद्यामागीलही कामे आली पाहिजेत, असा आग्रह मोहन वाघ यांनी धरला होता. त्यामुळे आम्ही सर्व कामे करायला शिकलो. आता निर्मिती आणि दिग्दर्शन करताना केलेल्या कामाचाच अनुभव उपयोगी पडत आहे. माझे बालपण चाळीत गेले. तेथील वातावरण हे फार गोड होते. गणेशोत्सवातील कार्यक्रमात नृत्य सादर करून अनेक बक्षिसे मिळवली आहेत. आम्ही नाटक स्वत: बसवायचो. कधी एखाद्या कार्यक्रमात रोल मिळाला नाही, तर पडदा पाडण्याचे कामही केले आहे. मी ज्या क्षेत्रात वावरत आहे, ती सर्व क्षेत्रे अभिव्यक्तीची आहेत. त्यांचे खंडण तुम्ही करता. अभिव्यक्ती करणारी कलावंत म्हणून मी नंबर एकलाच आहे. माझ्या पहिल्या नाटकाच्या आठवणी काढून प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत, म्हणजेच अभिव्यक्तीच्या क्षेत्रात मी मास्टर्स आहे. एखाद्या कलाकृतीच्या पुढे दुनिया झुकते. पण, ते यश चिरकाल टिकणारे नसते. पुढील काळात चित्रपट दिग्दर्शन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
माझ्या जडणघडणीला सुरुवात शाळेतून झाली. शाळा ही सावलीसारखी माझ्या पाठीशी आहे. राहावे कसे, विचार कसा करावा, हे शाळेकडून शिकले. माणसाकडे माणूस म्हणून पाहा. माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. माणसांची क्षमता ओळखून त्यांना समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

कलाकारांमुळेच संगीत रंगभूमी लयाला
संगीत रंगभूमी मृत झाली आहे, असे बोलले जात असले, तरी ती मारण्याचे काम कलाकारांनीच केले आहे. एखादा कलावंत दोन तास, तर दुसरा दीड तास गातो. कुठे थांबायचे, हे न कळल्यामुळे संगीत रंगभूमी मृत झाली आहे.
संगीत मत्स्यगंधा हे नाटक करताना ते अडीच तासांच्या वर करणार नाही आणि चार मिनिटांच्या वर गाणे असणार नाही, हे मी ठरवले होते. प्रेक्षकांची जास्त ऐकण्याची क्षमता नाही, हे पाहून नाटक बांधावे लागते. एखाद्या कलाकृतीसाठी कलाकार शोधले पाहिजेत.
समुद्र धुंडाळून काढला तरच हिरा मिळेल. योग्य कलाकार मिळाल्याशिवाय नाटक करायचे नाही, हे ठरवले होते. मी तडजोड करत नाही, हा माझा दोष आहे, असे संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: 'My feet on the journey of art, manhood on the ground'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे