आरोपीच्या सुटकेसाठी मायलेकींचा धुडगूस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:23 AM2019-10-16T01:23:59+5:302019-10-16T01:24:24+5:30
चक्क पोलीस ठाण्यात घडला प्रकार : कागदं फेकून एपीआयला दिली धमकी
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दुचाकी जाळल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आशीष गिरी याच्या सुटकेसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या आईने आणि बहिणीने गोंधळ घातल्याचा प्रकार नुकताच घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ज्योती सतीश गिरी (४३) आणि दिशा (२२) या मायलेकींविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
टेकडी बंगला परिसरातील ‘ठाणेदर्शन’ सोसायटीसमोरील सुनील चव्हाण (२२) यांची मोटारसायकल कोणीतरी जाळल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास केली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र, शहरात वाहने जळीतकांडाचे अनेक प्रकार घडलेले असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच शक्ती ऊर्फ चंकी म्हात्रे आणि आशीष गिरी या दोघांना त्याच दिवशी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. मद्यप्राशन केल्यानंतर सिगारेट मोटारसायकलच्या सीटवर विझवताना दारूच्या नशेत त्यांच्याकडून हा प्रकार झाल्याची कबुली या दोघांनीही पोलिसांना दिली. या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आशीषची आई ज्योती आणि बहीण दिशा यांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांच्यासमोरील कागदांची फेकाफेक केली.
‘आम्हाला विनाकारण त्रास का देता, तुम्हाला बघून घेऊ’, असे म्हणून आरोपीची आई ज्योती आणि बहिण दिशा यांनी सहायक पोलीस निरीक्षक आवारे यांना धमकीही दिली. याप्रकरणी या दोघींविरुद्ध कलम १८६ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनाही समज देऊन नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.