ठाण्यात राहत्या घरात दोघांचा गूढ मृत्यू, चितळसर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:55 PM2024-01-06T13:55:06+5:302024-01-06T13:56:33+5:30
याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
ठाणे : चितळसर मानपाडा भागातील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटल इमारतीमध्ये समशेर बहादूर रंनबाज सिंग (६८) या सुरक्षारक्षकाचा आणि त्याची पत्नी मीना समशेर सिंग (६५) या दोघांचाही त्यांच्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघड झाली. त्यांचा खून केल्याचा संशय त्यांचा मुलगा सुधीर सिंग (३८) याने व्यक्त केला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली.
सुरक्षारक्षकाचे काम करणारे बहादूर हे दूध विक्रीचे काम करणारी त्यांची पत्नी मीना हिच्यासह चितळसर येथील बिल्डिंग क्रमांक १ मधील १४व्या मजल्यावर वास्तव्याला होते, तर वेअर हाउसमध्ये काम करणारा त्यांचा मुलगा अंबरनाथ येथे राहतो. सुधीर आई - वडिलांची फोनवरून अधूनमधून चौकशी करीत असे. ३ जानेवारी रोजी सकाळी त्याने फोन केला, तेव्हा पोटात काहीतरी गडबड असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे केली.
बेशुद्ध अवस्थेत
४ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी फोनच घेतला नाही. संशय आल्याने त्याने रात्री उशिरा ठाणे गाठले. तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.
मृतदेह तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात
या दोघांच्याही अंगावर त्यांना मारल्याच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. त्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, घरातील दागिने किंवा मौल्यवान वस्तूही चोरीस गेलेल्या नसल्याचे आढळल्याने यात संभ्रम वाढल्याचेही ते म्हणाले.