ठाण्यातील बार गायिकेच्या आत्महत्येचे गुढ पाच दिवसांनतरही कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:40 PM2017-11-30T13:40:59+5:302017-11-30T13:50:13+5:30
पश्चिम बंगालची एक तरूणी ठाण्यातील एका बारमध्ये गायिका म्हणून काम करायची. एका सोसायटीत भाड्याने राहणाºया या तरूणीने रविवारी १२व्या मजल्यावरून आत्महत्या केली. पाच दिवस उलटले तरी या आत्महत्येमागचे रहस्य अद्याप कायम आहे.
ठाणे : नौपाड्यातील एका बारमध्ये गाणार्या पश्चिम बंगालच्या तरूणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गुढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही काही वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तपासामध्ये उघड झाली आहे.
पश्चिम बंगालची सुनिता दास (वय २८) नौपाड्यातील एका बारमध्ये गाणे गाण्याचे काम करायची. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस ज्वेल्समध्ये बाराव्या मजल्यावर ती भाड्याने रहायची. रविवारी रात्री उशिरा तिने इमारतीवरून उडी मारली. पोलिसांनी तिच्या फ्लॅटची पाहणी केली असता, तिथे मद्याचे ग्लास आणि अधर्वट जळालेल्या सिगोटस् होत्या. तरूणी अविवाहित असून, ती नशेच्या अधीन असावी, असा संशय आहे. तिच्या हातावर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसल्या. त्यावरून तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असे दिसत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले. तिच्या पश्चिम बंगालस्थित नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ठाण्यात येऊन मृतदेहाचा ताबा घेतला. नातलगांना सुनिता दासबाबत तपशीलवार विचारपूस करण्यात आली. तिचा स्वभाव, तिला काही अडचणी होत्या का, कुणाचा त्रास होता का अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेण्यात आली. मात्र असा कोणताही प्रकार नसल्याची माहिती नातलगांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले. सुनिताचे वास्तव्य असलेल्या कॉसमॉस ज्वेल्स सोसायटीतील रहिवाशांकडूनही पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडूनही विशेष माहिती मिळाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नसल्याने ती नौपाड्यातील ज्या बारमध्ये कामाला होती, तेथील संबंधित लोकांचे जबाब नोंदविले जातील, अशी माहितीही पोलिसांनी दिली. सुनिता दासचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले असून, ते प्राप्त झाल्यानंतर तिने शेवटचा कॉल किंवा मेसेज कुणाला केला होता, ती वारंवार कुणाच्या संपर्कात होती इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.