नागम्मा शेट्टी मृत्यूप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:43 AM2020-02-16T01:43:36+5:302020-02-16T01:43:51+5:30
काम सोडल्याने केली होती मारहाण। मानपाडा पोलिसांचा तपास सुरू
कल्याण : वडापाव स्टॉलवरील भांडी घासण्याचे काम नागम्मा शेट्टी (४०, रा. मानपाडा, डोंबिवली) यांनी सोडले होते. त्या रागातून मानसी ऊर्फ मंगल, सुजाता, संगीता आणि त्यांचा भाऊ आनंद यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार नागम्माच्या मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली. त्यानुसार, पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पूर्वेतील उंबर्ली रस्त्यावरील बुवा वाकळे याच्या वडापावच्या गाडीवर भांडी धुण्याचे काम नागम्मा करत होत्या. ८ फेब्रुवारीला बुवासोबत झालेल्या वादानंतर नागम्मा यांनी गाडीवरील काम सोडले. त्यानंतर, सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नागम्मा व त्यांची मोठी मुलगी घरासमोर उभ्या होत्या. यावेळी, भांडी व्यवस्थित धूत नाही, असे म्हणत बुवाची लहान बहीण मानसी ऊर्फ मंगलने नागम्माला शिवीगाळ केली. यावेळी तेथे आलेल्या मानसीच्या बहिणी सुजाता, संगीता आणि भाऊ आनंद यांनीही नागम्माला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना नागम्माच्या मुली तिला घरात नेत होत्या. त्याचवेळी, चौघांनी मिळून नागम्माला अडवून ठेवले. तसेच तिला व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नागम्माच्या जावयाने व इतरांनी चौघांच्या तावडीतून नागम्माची सुटका केली. त्यानंतर, मुलगी व जावयासह नागम्मा मानपाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या. तेथे नागम्माला प्रथमोपचारासाठी जायला सांगत तेथून आल्यावर तक्रार घेतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून मेमो घेतल्यानंतर उद्या रुग्णालयात जाऊ, असे मुलीला सांगत नागम्मा यांनी घर गाठले. त्याच रात्री नागम्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे नागम्मा यांची मुलगी अंजू शेट्टी यांनी मानपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पोलीस उपायुक्तांना निवेदन
भाजपच्या ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे यांनी नागम्माच्या मुलींसह शुक्रवारी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत नागम्माला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.