नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

By जितेंद्र कालेकर | Published: August 13, 2024 10:24 AM2024-08-13T10:24:58+5:302024-08-13T10:25:40+5:30

एसटी महामंडळाच्या चुकीचा भुर्दंड शिक्षक असलेल्या एका प्रवाशाला बसला

Nagar-Thane ST passengers stranded for 13 hours Charged 480 rupees for the journey of 350! | नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे-नगर या मार्गावर राज्य परिवहन सेवेच्या मोजक्या बस आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी ब्रेक डाउन झाला तर महामंडळाकडून चालक-वाहकांना वेळेत मदतही मिळत नाही. त्यामुळे पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ठाण्यातील काही प्रवाशांना १३ ते १४ तासांच्या प्रवासाचा कटू अनुभव घ्यावा लागला. एसटी महामंडळाच्या या चुकीचा भुर्दंड मात्र शिक्षक असलेल्या एका प्रवाशाला दुसऱ्या बसच्या वाहकाने अतिरिक्त तिकीट आकारल्याने सोसावा लागल्याचा प्रकार रविवारी समोर आला.

ठाण्यातील शिक्षक अजित जगताप यांना असाच अनुभव आला. नगर येथून रोज दुपारी २:४५ वाजता सुटणारी नगर ते ठाणे ही बस १० ऑगस्ट रोजी नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली. ओतूर  सोडल्यानंतर मढजवळील एका हॉटेलजवळ चालकाच्या बाजूचे मागील एक चाक पंक्चर झाल्याचे सायंकाळी सहाच्या सुमारास सांगितले. त्यामुळे प्रवाशांना कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या अन्य बसमध्ये बसवून देण्याची तजवीज चालक, वाहकांनी केली.

कल्याणवरून रेल्वेने जाण्याचा सल्ला

  • कल्याणपर्यंतचे प्रवासी तयार झाले; पण ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे काय? यावर चालक आणि वाहकांकडे पर्याय नव्हता. त्यांनी कल्याणवरून रेल्वेने जाण्याचा सल्ला प्रवाशांना दिला. त्यानंतर ठाण्याकडे जाणाऱ्या एका शिक्षकासह दाेघे प्रवासी राहिले. 
  • ठाणे डेपो आणि नारायणगाव डेपोकडे फोनाफोनी करूनही मध्यरात्री १२:४५ वाजता या बसच्या मदतीसाठी नारायणगाव येथून  एक दुरुस्तीचे पथक खुबी फाट्याजवळ आले. 
  • चाके बदलावी लागणार असल्याने ही बस नारायणगावला नेली. जगताप यांना रविवारी पहाटे एकच्या सुमारास तुळजापूर-कल्याण या बसमध्ये बसविले.


प्रवाशाला नाहक मनस्ताप

  • जगताप यांनी नगर ते ठाणे या प्रवासाचे ३५० रुपयांचे तिकीट सुरुवातीलाच घेतले हाेते.  त्यामुळे त्यांना ठाण्यापर्यंत नेण्याची एसटीची जबाबदारी होती. 
  • प्रत्यक्षात दुसरा दिवस सुरू झाल्याचे कारण सांगून त्यांना तुळजापूरच्या वाहकाने खुबी फाटा ते कल्याणच्या प्रवासासाठी पुन्हा १३० रुपयांचे तिकीट घ्यावे लागेल, असे सांगितले. 
  • इकडे आधी घेतलेले नगर ते ठाणे हे तिकीटही  नादुरुस्त बसच्या वाहकाने त्यांच्याकडून घेतले. या बसने जगताप ११ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये पहाटे ३:३०च्या सुमारास पोहोचले. त्यानंतर ते लोकलने ठाण्याकडे ५:३०च्या सुमारास पोहोचले.

Web Title: Nagar-Thane ST passengers stranded for 13 hours Charged 480 rupees for the journey of 350!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.