पराभवाच्या भीतीने नाईक, आव्हाडांनी सोडले मैदान - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:20 AM2019-04-03T03:20:00+5:302019-04-03T03:20:19+5:30
एकनाथ शिंदे : ठाण्यातील मेळाव्याचे आयोजन; कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचा सल्ला
ठाणे : ठाणे आणि कल्याणमध्ये ज्यांनी निवडणूक लढवणे गरजेचे होते, त्यांनी आधीच मैदान सोडले आणि आता म्हणे बोहल्यावर चढविलेल्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना आपला पराभव दिसल्यानेच त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा टोला शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा नामोल्लेख न करता लगावला.
ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आत्मविश्वास असावा मात्र फाजील आत्मविश्वास नसावा असा सल्ला त्यांनी राष्टÑवादीला दिला. मात्र आपणही गाफील राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दोघांनी मैदान सोडल्याने, जबरदस्तीने कल्याण आणि ठाण्यात नको त्यांना बोहल्यावर चढविले आहे. परंतु ते ९ एप्रिलपर्यंत राहतात की नाही याचाही पत्ता नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मागील वेळेस लोकसभेत युती झाली होती, परंतु विधानसभेत दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील त्या विसरुन कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
एकदिलाने काम करा - रवींद्र चव्हाण
पूर्वीपासून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मधल्या काळात काही चुका झाल्या असतील. परंतु आता त्या सुधारण्यात आल्या असल्याचे मत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदींना मत असल्याचे सांगून विचारेंसाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.