महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:21 AM2021-03-14T08:21:15+5:302021-03-14T08:22:46+5:30

आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे.

Naina's development will get a boost with MahaMumbai | महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर

महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर

Next

ठाणे : सध्या एमएमआरडीए क्षेत्रात सर्वांत जास्त विकास पनवेल-कर्जत-खालापूर क्षेत्रात होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्रात या परिसराचा समावेश झाल्याने भविष्यात या परिसराच्या विकासासाठी हा उपनगरीय मार्ग गरजेचा आहे. भविष्याची ही चाहूल ओळखूनच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्ग प्रस्तावित केला आहे.

आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे.

नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावर खारकोपरपर्यंत लोकल वाहतूक सुरू झाली आहे. जेएनपीटीच्या विस्ताराचे काम जोमाने सुरू आहे. पुढे उरण-पनवेल-कर्जत मार्ग जोडण्यात येणार आहे. शिवाय, नैना क्षेत्रातील २३ गावांच्या टीपी प्लानला राज्याच्या नगरविकास खात्याने पहिल्या टप्प्यात परवानगी दिली असून, तेथे मोठमोठ्या विकासकामांची बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यातच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा विस्तार, विरार-अलिबाग कॉरिडोर आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फ्रंट्रिअर कॉरिडोरमुळे या परिसरात येत्या काळात उद्योगांसह मानवी वस्ती वाढणार आहे. यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण होणे खूपच गरजेचे आहे. 

प्रवास होणार सुकर - 
सध्या अंबरनाथ-बदलापूरसह कर्जतच्या प्रवाशांना रेल्वेमार्गे नवी मुंबईला यायचे झाल्यास त्यांना कल्याण-दिवा-ठाणे मार्गाशिवाय पर्याय नाही. यात त्यांचा वेळ, श्रम, पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र, कर्जतहून थेट पनवेलपर्यंत उपनगरीय सेवा सुरू झाल्यास त्यांना पनवेलमार्गे थेट नवी मुंबईसह उरण-जेएनपीटीत जाणे-येणे सोपे होणार आहे. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील विविध कंपन्या, वाशी, बेलापूर स्थानके आणि महापेतील आयटी पार्कसह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ये-जा करण्याचा कल्याण-ठाणेमार्गे होणारा द्राविडीप्राणायाम कमी होणार आहे.

सिडकोवर टाकणार भार
पनवेल-कर्जत मार्गाचा सिडकोसही फायदा होणार असल्याने त्याचा ५० टक्के खर्च अर्थात ६९५.७५ कोटी रुपये सिडकोस देण्यास सांगण्यात आले आहे. कारण, हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर नैना क्षेत्रातील सिडकोच्या मालमत्तांच्या किमती वाढणार आहेत.

निधी उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर
पनवेल-कर्जत मार्गासह एमयूटीपी-३ अंतर्गत सर्व प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारून तो रेल्वे विकास महामंडळास देण्याची जबाबदारी शासनाने एमएमआरडीएवर सोपवली आहे. यात जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. यामुळे महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद आहे.

Web Title: Naina's development will get a boost with MahaMumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.