निवडणुकीपुरती वचने देत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:58 PM2017-07-29T23:58:48+5:302017-07-29T23:59:58+5:30
निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू , असे सांगून जातात. परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
ठाणे : निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू , असे सांगून जातात. परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता लगावला. शिवसेनाच निवडणुकीतील वचनपूर्ती करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक सेंटर, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, ठाण्याचे भूषण ठरणारे अतिशय देखणे असे ग्रॅण्ड सेंट्रल पार्क यांचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच पोखरण रोड क्र .-२ येथील कम्युनिटी पार्कचे लोकार्पण आणि वेबपोर्टलचा शुभारंभही झाला. दरम्यान, सेंट्रल पार्क येथील भाषणात ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. राजकारणात युती होते आणि तुटते, पण ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जे मनोमिलन आणि युती झालेली आहे, ती दीर्घकाळ अबाधित राहावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ठाण्यात चांगले काम करणा-या आयुक्तांची जशी परंपरा आहे, तशीच आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाºया लोकप्रतिनिधींची देखील आहे, असे नमूद करून चांगल्या कामासाठी शिवसेना प्रशासनाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ठाणेकरांनी सातत्याने शिवसेनेचा भगवा आपल्या हातात घेतला आहे. मुंबई ही माझी आहे आणि ठाणेही माझेच आहे. दोन्ही ठिकाणच्या लोकांचे प्रेम माझ्यावर सारखेच आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे मुंबईपेक्षा पुढे गेले तर त्यात मला आनंदच वाटेल, असेही ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या काळात मी तुमच्याकडे हक्काने मते मागितली आणि ठाणेकरांनीही त्याच विश्वासाने मते दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.