वाढदिवसाच्या निमित्ताने नजीब यांचे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:12 AM2019-01-22T01:12:25+5:302019-01-22T01:12:36+5:30
राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे रविवारी मुंब्य्रात पाहावयास मिळाले.
ठाणे : राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे रविवारी मुंब्य्रात पाहावयास मिळाले. राष्टÑवादीचे नाराज ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करून पक्षाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
बाइक रॅली, लाल दिव्याच्या गाडीचा केक, भावी आमदार अशा घोषणा आणि बॅनरने संपूर्ण मुंब्रा शहर दणाणून सोडले. त्यातच अल्ला की मर्जी होगी तो आमदार भी हो जाऊंगा, अशी तिखट मात्र जिव्हारी लागणारी प्रतिक्रिया मुल्ला यांनी दिल्याने येत्या काळात राष्टÑवादीमध्ये काहीतरी मोठी ठिणगी पडणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून राष्टÑवादीमध्ये आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे असा संघर्ष सुरू असून तो श्रेष्ठींपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आता तर मुल्ला वाढदिवसाच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर अचानकपणे त्यांनी मुंब्य्रात पाय ठेवला. त्यांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात आणि बाइक व कार रॅलीसह २४ ठिकाण केक कापून करण्यात आले. ते ज्याज्या भागातून जात होते, त्यात्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून नजीब मुल्ला आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आमचे भावी आमदार अशा घोषणा दिल्या गेल्या. एकूणच परिस्थिती पाहता निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
>अंतर्गत कलह व्हॉट्सअॅप ग्रुपवरही रंगला
राष्टÑवादीच्या युवक ठाणे शहर जिल्हा या व्हॉट्सअॅप ग्रुपवरसुद्धा यानिमित्ताने दोन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. मुल्ला यांनी अशा पद्धतीने शक्तिप्रदर्शन करून कुटुंबप्रमुखालाच डिवचल्याचा मुद्दा ओबीसी सेलचे राज राजापूरकर यांनी उपस्थित केला. त्याला मुल्ला समर्थक मोहसीन शेख यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले. मुल्ला हे आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही तेच राहणार आहेत, त्यामुळे बिनबुडाच्या (चापलूस) लोकांनी अशा द्वेषाने चुकीचे मेसेज टाकून संभ्रम पसरवू नये, असेही त्यांनी सुनावले.
>नऊ नगरसेवकांची हजेरी
या शक्तिप्रदर्शनास राष्टÑवादीच्या नऊ नगरसेवकांनी हजेरी लावून मुल्ला यांनी भावी आमदार व्हावे, या आशयाचे बॅनरही लावले.
शहरभर लावण्यात आलेले बॅनर, मुंब्य्रात झालेले जंगी स्वागत यातूनच राष्टÑवादीमध्ये काहीतरी आलबेल घडत आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.
त्यातच अल्ला की मर्जी होगी तो मंै जरूर आमदार बन सकता हूँ. कार्यकर्त्यांचीसुद्धा तीच इच्छा आहे, अशी तिखट प्रतिक्रिया अनेक गोष्टी सांगून जाणारी ठरली आहे.