शहापूरमध्ये साकारणार नक्षत्रवन
By admin | Published: March 5, 2016 03:40 AM2016-03-05T03:40:31+5:302016-03-05T03:40:31+5:30
निसर्गाचा अमूल्य ठेवा लाभलेल्या शहापूर तालुक्यात पर्यटनात झपाट्याने वाढ होत आहे. पर्यटनाला अणखी चालना मिळावी म्हणून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वन
मनोहर पाटोळे, आसनगाव
निसर्गाचा अमूल्य ठेवा लाभलेल्या शहापूर तालुक्यात पर्यटनात झपाट्याने वाढ होत आहे. पर्यटनाला अणखी चालना मिळावी म्हणून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वन पर्यटन उद्यानाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच हे उद्यान आबालवृद्धांच्या करमणुकीकरिता नक्षत्रवन या नावाने सुरू करण्यात येणार आहे.
सामाजिक वनीकरणातून १२ राशींच्या पंचांगाकृती नक्षत्रवनाची उभारणी करण्याचे काम शहापूर वन विभागात सुरू आहे. पंचांगातील राशी, नक्षत्र व चरणांचा यात समावेश आहे. या इको-फ्रेण्डली उद्यानात स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करून त्यांचे राशीप्रमाणे नामकरण केले जाणार आहे.
राज्य शासनाच्या वन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात ‘स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान योजने’अंतर्गत विविध वनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. शहापुरात पहिले जैवविविधता उद्यान उभारण्यात येत आहे. शहापूर वनपरिक्षेत्र हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत पेंढरघोळ नजीकच्या कानविंदे गुरचरण नं १३८ मध्ये १२.१० हेक्टरमध्ये मध्यभागी तब्बल ७६८० मातीच्या विटांचा वापर करून पंचांगाकृतीची मांडणी केली आहे. सुशोभीकरणाचे आणि वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे.
शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पाठपुराव्यानंतर या नक्षत्रवन उद्यानाचा पाया रचला जात आहे. त्याचा सर्वाधिक फायदा मुंबई- नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या व इतर शहरांतील पर्यटकांना घेता येणार आहे. संचालक फाले, वनपरिक्षेत्र तथा लागवड अधिकारी श्रीमती पी.आर. बागडे व सहा. लागवड अधिकारी वेहले यांनी उद्यानाची मांडणी केली असून, अल्पावधीतच निसर्गसंपत्तीचे दर्शन होणार आहे.