नारिवलीच्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:19+5:302021-06-24T04:27:19+5:30
मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे ...
मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेले, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुर्गम भागातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभलेला नसताना त्या गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला. या गावांमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. यानिमित्ताने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करूनही घेतला. कोणतीही ऐतिहासिक नोंद नसताना दुर्गम भागातील नारिवली, कळभांड, वैशाखरे, मढ, माळ, वेळूक या गावांना सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. पर्यटनाचा दर्जा देऊन त्या गावात भंगारवाले किंवा फेरीवाले यांच्या व्यतिरिक्त कुणीही फिरकत नाही. त्या गावांत विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. मात्र त्या गावांत दररोज येणाऱ्या पर्यटकांची नोंद होते की नाही याचा विचार मात्र प्रशासनाने केेलेला नाही.
नारिवली येथे चक्क स्मशानभूमीचा कायापालट हा पर्यटन क्षेत्राच्या निधीतून करण्यात आला आहे. स्मशानभूमीतच या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवारा केंद्र उभारले. मात्र त्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने हे केंद्र म्हणजे तरंगता बंगला वाटत आहे. दरम्यान, या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसतानाही या गावाला सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला कसा? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
-----------------------------------------------------
या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्यास त्याची अभियंत्यांमार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- एस. एम. कांबळे, उपअभियंता