पालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे
By admin | Published: June 27, 2017 02:57 AM2017-06-27T02:57:44+5:302017-06-27T02:57:44+5:30
शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले. सखल भागातील मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्ली पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले. सखल भागातील मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्ली पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
शहरात गेल्या २४ तासात २०५ मिलीमीटर पाऊस झाला असून रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचले. पावसाने रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने जागोजागी खड्डे झाले.तर काही ठिकाणी चिखल झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले. तीनबत्ती येथील गटारे तुंबून नाल्याचे पाणी बाहेर रस्त्यावर आले.
कल्याण रोडवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने भादवड येथे पाणी साचून वाहतूक खोळंबली होती.तर प्रभाग क्र. ४ मधील नाल्याची सफाई योग्यरितीने न झाल्याने समरूबाग व काकूबाईचाळ या ठिकाणी पूरग्रस्त स्थिती झाली. शहरात अपघातग्रस्त घटना घडली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अनगाव नाका येथील नाला तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसेच रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ््यापूर्वी डांबरीकरण केले होते.