नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना ‘पाकिटे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:44 PM2019-06-12T23:44:15+5:302019-06-12T23:45:29+5:30
मोरे यांचा आरोप : चौकशीची मागणी
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील नालेसफाईचे पितळ पहिल्याच पावसात उघड झाले. यावर संतप्त झालेले शिवसेनेचे कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक व माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना दहा हजारांची पाकिटे वाटण्यात आल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले असून विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी मोरे यांच्या आरोपाची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.
मोरे यांचा आरोप गंभीर आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या सदस्यांसह प्रशासनातील अधिकारी यांच्यात या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून याची चौकशी करावी. नगरसेवकांनी पाकिटे कधी आणि कोणी वाटली याचा छडा लागला पाहिजे. त्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. मोरे यांनी या वक्तव्याचे तातडीने खंडन करावे. कारण, मनसेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या नालेसफाईच्या पाकीटवाटपाशी काहीही संबंध नाही. मोरे यांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या नगरसेवकांकडे चुकीच्या नजरेने पाहिले जात आहे. नालेसफाई झाली नाही, या मोरे यांच्या आरोपात तथ्य आहे.
मात्र नालेसफाई झालेली नसताना ती केली असून त्याविषयी नगरसेवकांनी मौन बाळगावे याकरिता त्यांना दहा हजारांची पाकिटे दिली गेली असल्याच्या आरोपात किती तथ्य आहे? नालेसफाई योग्य प्रकारे करण्यासाठी मनसेकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.