नाल्यातच बेकायदा बांधकामे, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:28 AM2018-10-05T05:28:27+5:302018-10-05T05:28:31+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील प्रकार, प्रवाहाचा मार्ग झाला अरुंद
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याचा प्रवाह बेकायदा बांधकामांनी अरुंद केला आहे. त्यातच, नव्याने अनेक बांधकामे नाल्यातच केली जात आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या दुकानदारांनी मागच्या नाल्यातच बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन विलंब लावत आहे.
अंबरनाथ, कल्याण-बदलापूर रोडला अंबरनाथमध्ये समांतर असा नाला वाहत आहे. पूर्वी या नाल्याची रुंदी ही ६० फुटांपेक्षा अधिक होती. मात्र, या मुख्य नाल्याच्या किनाºयावरच मोठी बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांवर कारवाई न झाल्याने नाल्याचा प्रवाह ६० फुटांवरून अवघ्या १० ते २० फुटांवर आला आहे. अनेक बेकायदा बांधकामे थेट नाल्यात अतिक्रमण करून उभी राहत असल्याने मुख्य नाल्याच्या प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचा प्रवाह अरुंद पडत असल्याने अनेक सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. विम्कोनाका ते अंबरनाथ तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या नाल्याचाच विचार केला, तर अनेक दुकाने आणि बांधकामे थेट नाल्याच्या प्रवाहात केल्याचे उघड होत आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांनीही थेट नाल्याचा प्रवाह बदलून आपल्या कंपन्या उभ्या केल्या आहेत. नाल्याचा प्रवाह अरुंद होत असल्याची कल्पना पालिका प्रशासनाला असतानाही पालिकेचे अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नाल्यातील अतिक्रमण वाढतच आहे. या वाढत्या अतिक्रमणांबाबत पालिकेने नाल्याच्या किनाºयावर असलेल्या सर्व बेकायदा बांधकामांना नोटीस बजावणे गरजेचे आहे. मात्र, नोटीस तर दूरच राहिली, उलट नव्याने होणारी बांधकामेही पालिका प्रशासन रोखत नाही. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या मागच्या भागात असलेल्या नाल्यातच बांधकामे सुरू केली आहेत.
एका दुकानदाराने तर नाल्यात थेट आरसीसी बांधकाम करून नाल्याच्या प्रवाहातच दुकानाचे वाढीव बांधकाम केले आहे. गेल्या महिनाभरापासून बांधकामे सुरू असतानाही पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हीच परिस्थिती विम्कोनाक्याला लागून असलेल्या कंपन्यांचीही झाली आहे. या कंपन्यांनीही नाल्याची रुंदी कमी करून बांधकामे सुरू केली आहे.
नाल्यात कोणतेही बांधकाम सुरू असेल, तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. नाल्याचा प्रवाह रोखण्याचा आणि त्यावर अतिक्रमण करण्याचा कुणाचाही अधिकार नाही.
- देविदास पवार, मुख्याधिकारी
कंपन्यांवर कारवाई नाही
च्नाल्याचा प्रवाह बदलल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींची कोणतीच दखल पालिकेने घेतली नाही.कंपनी मालकाने थेट नाल्याचा प्रवाह बदलला.
च्अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्याचे रूंदीकरण झाल्यावर दुकाने तुटलेल्या मालकांनी थेट मागच्या बाजूला नाल्यात अतिक्रमण करून आपली दुकाने थाटलेली आहेत.