मीरा-भाईंदरमध्ये नालेसफाईला सुरुवात
By admin | Published: May 11, 2017 01:52 AM2017-05-11T01:52:54+5:302017-05-11T01:52:54+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे यंदा नालेसफाईच्या सुमारे २ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे यंदा नालेसफाईच्या सुमारे २ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नालेसफाईची डेडलाईन १० जून ठरवल्याचे स्वच्छता विभागाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले.
शहरात कच्चे व पक्के असे एकूण १५७ नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई मेच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होणे अपेक्षित असते. यंदाही काहीशा विलंबाने नालेसफाईला सुरूवात होणार आहे. स्थायीने मंजुरीपूर्वी प्रशासनाने तत्कालिन महासभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचे सोपस्कार पार पाडले. त्यामुळे नालेसफाईसाठी आवश्यक निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षी पुरेशा निधीवरून नालेसफाईला विलंब झाला होता. यंदा मात्र अगोदरच आवश्यक निधीवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अंदाजित केला आहे. त्यात बोटीसह व बोटीखेरीज प्रत्येकी २ व सहा पोकलेन मशीन, ४ जेसीबी, १६ डंपर, २ टोरस, प्रत्येकी एक हायड्रा व क्रेन मशीन, ४५० ते ५०० मनुष्यबळाच्या खर्चाचा समावेश आहे.
महिनाभर चालणाऱ्या सफाई मोहीमेसाठी १० जूनची डेडलाईन निश्चित केली आहे. नालेसफाईवर कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक व प्रभाग अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण राहणार आहे. त्याचा दैनंदिन अहवाल उपायुक्तांना सादर करावा लागणार आहे.
आशापुरा कंस्ट्रक्शन कंपनी, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता व मुकादम यांची बैठक घेत त्यांना नालेसफाईबाबतचे निर्देश दिले. तसेच दैनंदिन सफाई मोहीमेतंर्गत प्रत्येक मशीनसह मनुष्यबळ व कामाची नोंद करणे बंधनकराक केले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.