नळपाणी योजनेला ‘जलयुक्त’चे बळ
By Admin | Published: June 8, 2015 04:24 AM2015-06-08T04:24:39+5:302015-06-08T04:24:39+5:30
पाण्याची समस्या सोडवून ग्रामस्थांचे दु:ख कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेला आता जलयुक्त शिवार अभियानातून ताकद देण्यात येत आहे.
कर्जत : तालुक्यात मांडवणे ग्रामपंचायतीमध्ये शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल आणि मृदू संधारणाची कामे सुरु आहेत. पाण्याची समस्या सोडवून ग्रामस्थांचे दु:ख कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेला आता जलयुक्त शिवार अभियानातून ताकद देण्यात येत आहे. २०१३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या आणि दोन वर्षे काम सुरु असलेल्या नळपाणी योजनेच्या पूर्णत्वासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.
साधारण ८० घरांची वस्ती असलेल्या मांडवणे गावासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. ५० लाख रु पये खर्चाच्या या योजनेमध्ये उद्भव विहीर, जलकुंभ, अशुद्ध जलवाहिनीअंतर्गत जलवाहिन्यांचा अंतर्भाव होता. मोठ्या प्रमाणात घरगुती नळजोडण्या आणि सार्वजनिक स्टँड पोस्टवर नळ असे नियोजन असलेली ही योजना अनेक महिने धीम्या गतीने पुढे जात आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. मात्र नळपाणी योजनेच्या कामामध्ये सातत्य नसल्याने वेळेत ही योजना पूर्ण होऊ शकली नाही.त्यामुळे मांडवणे गावाची निवड ज्यावेळी जलयुक्त शिवार अभियानासाठी झाली त्यावेळी या नळपाणी योजनेला गती देण्याचा निर्णय जलयुक्त शिवार अभियानाचे कर्जत तालुक्याचे मुख्य समन्वयक उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी घेतला. याबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला ही योजना पूर्ण होण्यासाठी यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या या योजनेचे पेज नदीवर मुख्य उद्भवाच्या ठिकाणी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. गावामध्ये ४० हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ पूर्ण झाले असून उद्भव विहिरीपासून जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहेत. वीज जोडणी करण्यात आल्याने गावातील अंतर्गत जलवाहिन्या फिरविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नळपाणी योजना सुरु होऊ शकते. ठेकेदार कंपनीने तत्काळ गावातील नळजोडण्या टाकून सार्वजनिक स्टँड पोस्ट तसेच घरोघरी नळ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या जोडण्या टाकण्याचे काम जलदगतीने केल्यास मांडवणे येथील रहिवाशांना नळपाणी योजनेचे पाणी अल्पावधीत मिळू शकते. (वार्ताहर)