नगरसेविकेचेच नाव मतदारयादीतून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:06 AM2019-05-04T01:06:45+5:302019-05-04T01:06:56+5:30
अंबरनाथमधील प्रकार : तहसीलदारांकडे केली तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी
अंबरनाथ : लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतील घोळामुळे अनेकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. मतदारयादी निश्चित करण्याआधी जी प्रारूप यादी तयार करण्यात येते, त्यात नाव असतानाही ऐन निवडणुकीच्यावेळी मतदारयादीतून स्थानिक नगरसेविकेचेच नाव वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या नगरसेविकेने तहसीलदारांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.
चिखलोली भागातील नगरसेविका सारिका शिंगवे यांचे नाव त्यांच्या ३०३ क्रमांकाच्या मतदारयादीत समाविष्ट होते. मतदारयादीतील नाव हे जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीतही होते. त्यामुळे त्या निश्चिंत होत्या. मात्र, निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी जाण्याआधी त्यांनी यादीतील नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता शिंगवे आणि त्यांचे पती रामदास या दोघांची नावे वगळण्यात आली होती. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नाव नसल्याने त्यांनी अॅपवरून त्यांचे नाव शोधले असता थेट उल्हासनगर कुर्ला कॅम्प परिसरात असल्याचे लक्षात आले. चिखलोली गावातील नाव थेट उल्हासनगरच्या यादीत गेल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
लोकसभा निवडणूक असल्याने त्यांनी उल्हासनगरमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, भविष्यात ही चूक पुन्हा झाल्यास त्यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीला मुकण्याची वेळ आली असती. यासंदर्भात शिंगवे यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता बीएलओने त्यांचे नाव न वगळण्याचा अहवाल दिला होता. मात्र, असे असतानाही त्यांचे नाव स्थलांतरित करण्यात आले.
याप्रकरणी शिंगवे यांनी चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेविकेच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया शिंगवे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही अनेकांची नावे वगळल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.