मृतांची नावे यादीत; तर हयात मतदार बेपत्ता

By admin | Published: February 22, 2017 06:10 AM2017-02-22T06:10:07+5:302017-02-22T06:10:07+5:30

वागळे इस्टेट, वर्तकनगर या परिसरात अनेक मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब असल्यामुळे

Name of the deceased; If the survivors of the missing people disappear | मृतांची नावे यादीत; तर हयात मतदार बेपत्ता

मृतांची नावे यादीत; तर हयात मतदार बेपत्ता

Next

ठाणे : वागळे इस्टेट, वर्तकनगर या परिसरात अनेक मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेक मृतांची नावे मात्र मतदार यादीत होती. अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना नावे शोधण्यात बराच वेळ खर्ची घालावा लागला.
मतदान यंत्रातील बिघाडामुळे शिवसेनेच्या नगरसेविका तथा उमेदवार विमल भोईर यांना तर अर्धा तास मतदान केंद्रातच ताटकळावे लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या जिजामाता बचत गट येथील मतदान केंद्रावर भोईर या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मंगळवारी सकाळी ७.३० वा. गेल्या होत्या. मतदान यंत्राचे वारंवार बटण दाबूनही त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आवाज येत नव्हता. ते बंदच असल्याचे आढळल्यावर त्यांनी ही बाब मतदान केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची पाहणी करून ते बदलण्याच्या प्रक्रियेत अर्धा तास गेला. अखेर ८ वा. भोईर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक सात येथील २७ क्रमांकाच्या केंद्रावर मतदान यंत्र अ, ब, क आणि ड या क्रमाने लावण्याऐवजी ड, क, ब आणि अ या उलट्या क्रमाने लावली होती. त्याला मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि इतर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर यंत्र पुन्हा अ ते ड या क्रमाने लावण्यात आली. असाच गोंधळ वर्तकनगरच्या ३१० आणि ३११ या मतदान केंद्रावर होता. याठिकाणीही शिवसेनेच्या उमेदवार विमल भोईर यांनी आक्षेप घेतल्यावर याठिकाणची यंत्रे अ ते क या क्रमाने ठेवण्यात आली. (प्रतिनिधी)

वागळे इस्टेट पोलीस वसाहतीमधील अनेक पोलीस कुटुंबीयांची नावेच मतदार यादीमध्ये नसल्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारांना मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी मतदान केंद्राच्या बाहेर आपापली मदत केंद्रे उभारली होती. पण, या केंद्रावरही महापालिकेच्या संकेतस्थळावरुन नावे शोधण्यात कार्यकर्त्यांची आणि मतदारांची चांगलीच दमछाक होत होती.

माजी नगरसेवक बळीभाई नईबागकर यांची पुतणी तृप्ती नईबागकर हिचेही मतदार यादीतील फोटो वगळता नाव, वय चुकीचे होते. नईबागकर ऐवजी पवार असे आडनाव प्रसिद्ध झाल्याने त्यांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागला.

कोरस नक्षत्र येथील १५ इमारतींमध्ये ४२० सदनिका आहेत. सहा महिन्यांपूर्वी येथील रहिवाशांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्जही भरुन दिले. तरीही येथील ७० ते ८० मतदारांची नावेच न आल्यामुळे त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याचे मिलन जाधव यांनी सांगितले. जे इतर जिल्ह्यातून बदली होऊन आले अशा मृण्मय जाधव यांच्यासह अनेकांची नावेच मतदार यादीत नव्हती. भास्कर बंगेरा, विठ्ठल पाटील, नीता पाटील यांची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नावे होती. यावेळी मात्र त्यांची नावे नसल्यामुळे त्यांनाही तेही मतदानापासून वंचित राहिले.

यादीतील घोळाचा चित्रपट निर्मात्यालाही फटका...

कोरस नक्षत्रमधील रहिवासी लेखक, चित्रपट निर्माते संजीव कोलते यांचेही नाव (प्रभाग क्र. १४ ) नसल्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही. अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे होते. वडिलांचा पत्ता कोरस नक्षत्रमध्ये तर मुलाचा पत्ता रुणवाल प्लाझामध्ये दाखविल्याचाही फटका अनेकांना बसल्याचे दिप्ती पांचाल यांनी सांगितले. अशा ७० ते ८० टक्के मतदारांना फटका बसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

श्रीनगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, भीमनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर आणि वसंतविहार भागातील वयोवृद्धापासून नवमतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळच्या वेळी असलेली मतदारांची गर्दी दुपारी काहीशी कमी झाली होती. तर ३.३० वा. नंतर पुन्हा अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

इंदिरानगर, रामनगर, शास्त्रीनगर आणि भीमनगर या झोपडपट्टी परिसरासह म्हाडा वसाहत, वसंतविहारसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील मतदारांनीही मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

Web Title: Name of the deceased; If the survivors of the missing people disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.