जमीनखरेदीच्या नावाखाली डॉक्टरांना १४ लाखांचा गंडा, भामट्याला कोल्हापुरातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 08:24 PM2017-08-10T20:24:11+5:302017-08-10T20:24:24+5:30
मुरबाडमधील आदिवासींची जमीन नावावर करून देतो, अशी बतावणी करून ठाण्यातील दोन ज्येष्ठ डॉक्टरांना सुमारे १४ लाखांचा गंडा घालणा-या दीपक बर्गे याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातून अटक केली.
ठाणे, दि.10 - मुरबाडमधील आदिवासींची जमीन नावावर करून देतो, अशी बतावणी करून ठाण्यातील दोन ज्येष्ठ डॉक्टरांना सुमारे १४ लाखांचा गंडा घालणा-या दीपक बर्गे याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातून अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाड्यातील डॉक्टर लालजी सेठिया (७५) आणि ऐरोलीतील डॉ. चंद्रकांत गंगावणे (७६) यांनी २०११-२०१२ मध्ये मुरबाड येथील आदिवासी जमीन उल्हासनगरच्या बर्गे याच्याकडून खरेदी केली होती. त्यासाठी डॉ. सेठिया यांनी त्याला दोघांचे प्रत्येकी सात लाख असे १४ लाख रुपये त्याच्या नौपाड्यातील घरी नेऊन दिले होते. यातील काही रक्कम रोख, तर काही धनादेशाच्या स्वरूपात दिली होती. २०११ ते २०१६ अशी पाच वर्षे उलटूनही बर्गे हा व्यवहार पूर्ण करत नव्हता. जमीन आदिवासी असली, तरी मंत्र्याकडून, शासनाकडून आणि तलाठ्याचीही परवानगी मिळवून आणतो, अशीही त्याने त्यांना वारंवार बतावणी केली. दरम्यानच्या काळात डॉ. सेठिया हे आजारी पडले. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा केला नाही. पण, वारंवार आश्वासने देऊनही बर्गे याने तलाठ्याची किंवा कोणत्याही मंत्र्याची संबंधित जमिनीच्या विक्रीची परवानगी आणली नाही. तसेच तो व्यवहार पूर्ण न करता, जमिनीचा ताबाही या दोन्ही डॉक्टरांना दिला नाही. अखेर, कंटाळून डॉ. सेठिया यांनी याप्रकरणी १८ आॅक्टोबर २०१६ ला नौपाडा पोलीस ठाण्यात बर्गे याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. नौपाडा पोलीस गेल्या वर्षभरापासून त्याच्या पाळतीवर होते. अखेर, तो कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, प्रकाश पाटील आणि संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ आणि गोविंद पाटील आदींच्या पथकाने त्याला ९ आॅगस्टला रात्री कोल्हापुरातून ताब्यात घेतले.
असा लावला सापळा...
खबरी आणि बर्गेच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे बनकर यांच्या पथकाने कोल्हापुरातील मूळ घर शोधले. ते बंदच होते. त्याच्या भावाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवसभर तळ ठोकून सापळा लावून अखेर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याला ठाण्यात आणून अटक केल्याचे निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.