पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेला तरुण १४ दिवसांपासून ठाण्यातून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:32 PM2019-02-14T22:32:47+5:302019-02-14T22:41:51+5:30

अंधश्रद्धेपोटी वाघबीळ येथून गेलेला विशाल शिंदे हा तरुण ठाण्यातून गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. एखाद्या भोंदू बाबाने त्याला फसविल्याची शक्यता असून त्याच्या शोधासाठी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

In the name of rain of money young man went missing from 14 days in Thane | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेला तरुण १४ दिवसांपासून ठाण्यातून बेपत्ता

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमुंबई-अहमदाबाद मार्गावर मिळाली मोटारसायकलभोंदूबाबाने फसविल्याची भीती

ठाणे : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जात असल्याचे सांगून ठाण्याच्या वाघबीळ येथील ३२ वर्षीय विशाल शिंदे हा तरुण गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशालची मोटारसायकल मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गावर १ फेब्रुवारी रोजी मिळाली असून त्याचा थांगपत्ता लागलेला नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. फाउंटन हॉटेलपर्यंत जाऊन येतो, तू जेवण तयार ठेव, असे ३१ जानेवारी रोजी आपल्या आईला सांगून तो घराबाहेर पडला. वाघबीळ परिसरात टुरिस्टचा व्यवसाय करणारा विशाल अविवाहित असून त्याला कोणताही आर्थिक तणाव नसल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे. ३१ जानेवारी रोजी ५४ वर्षीय प्रमोद मागी या मित्रासमवेत तो फाउंटन हॉटेलपर्यंत मोटारसायकलने गेला होता. नंतर, प्रमोद घरी परतला. त्यावेळी विशालने मी पैशांचा पाऊस पाडायला जात असल्याचे प्रमोदला सांगितले होते. गुजरात येथून एक बाबा अर्ध्या रस्त्यामध्ये भेटणार असल्याचेही त्याने सांगितले होते. यापूर्वीही अशाच कामासाठी तो कोकण आणि कर्नाटक भागात गेल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधश्रद्धेतून एखाद्या भोंदूबाबाने त्याची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त होत असून त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----------------
सर्वच बाजूंनी या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. विशालच्या अनेक मित्रांची जबानीही घेण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे त्याचे छायाचित्र आणि माहिती मुंबई, ठाण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये वितरित केली आहे. त्याची मोटारसायकल १ फेब्रुवारी रोजी मिळाली आहे. शोध पथकामार्फत त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दत्तात्रेय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे
......................... ..
 

Web Title: In the name of rain of money young man went missing from 14 days in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.