स्थायी समिती सभापतीपदासाठी चुरस, आता भाजपाची टर्म, मनोज राय आणि राहुल दामले यांची नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:07 AM2017-11-21T03:07:04+5:302017-11-21T03:07:26+5:30
कल्याण-डोेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्याने त्यांच्या जागी सोमवारी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
कल्याण : कल्याण-डोेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्याने त्यांच्या जागी सोमवारी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी महासभेत त्यांच्या निवडीची घोषणा केली. दरम्यान, समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे.
शिवसेनेचे सदस्य जयवंत भोईर, शालिनी वायले, दीपेश म्हात्रे, निलेश शिंदे, भाजपा सदस्य मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक, मनसे सदस्या तृप्ती भोईर या आठ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांची नावे सुचवली होती.
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जयवंत भोईर इच्छुक आहेत. भोईर यांनी आतापर्यंत पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नव्हते. त्यामुळे त्यांचा पक्षाकडून विचार होऊ शकतो. महापालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या स्थायी समिती सभापतीची संधी भाजपाचे संदीप गायकर यांना देण्यात आली होती. त्यानंतर, शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना सभापतीपद मिळाले. ते विद्यमान सभापती आहेत. आता पुन्हा भाजपाची टर्म असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाकडून नव्याने निवड झालेले मनोज राय व राहुल दामले या दोन सदस्यांची नावे चर्चेत आहेत.
मात्र, असे असले तरी पुराणिक हे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने राज्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला, तर त्यांचाही नंबर लागू शकतो. शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे हे पुन्हा सभापतीच्या स्पर्धेत उतरू शकतात. त्याचबरोबर शालिनी वायले व निलेश शिंदे हे देखील आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत. पक्षाकडून वायले व शिंदे यांचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>अपक्षांचा केवळ सत्तेसाठी वापर; स्थायी समितीत डावलल्याने व्यक्त केली नाराजी
कल्याण : केडीएमसीत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपाला अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या स्थायी समिती सदस्य निवडीत त्यांना डावलण्यात आले. केवळ सत्तेसाठी आमचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप पाठिंबा देणाºया अपक्ष सदस्यांकडून केला जात आहे. स्थायी समितीत सोमवारी शिवसेनेकडून जयवंत भोईर, शालिनी वायले, दीपेश म्हात्रे आणि निलेश शिंदे यांची निवड झाली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पत्राचे वाचन करताना सांगितले. भोईर यांना काहीच पद दिले गेले नव्हते. त्यामुळे त्यांची निवड रास्त आहे. मात्र, म्हात्रे यांना पुन्हा पक्षाने संधी दिली आहे. ते स्थायीचे सभापती व सदस्यही होते. तर, वायले व शिंदे यांनाही प्रथमच पद दिले आहे. शिंदे हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले. तेव्हा त्यांना कोणतेही पद दिलेले नव्हते.या पार्श्वभूमीवर अपक्ष नगरसेवक कासीब तानकी यांनी त्यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सलग दोन वर्षे स्थायीचे सदस्यपद दिले जाईल, असे महापौर, सभागृह नेते व गटनेते यांनी त्यांना कबूल केले होते. एक वर्षासाठीच त्यांना सदस्यपद दिले गेले. मात्र, या वेळी त्यांचा विचार न करता त्यांना डावलण्यात आले. तानकी यांच्या मते अन्य अपक्ष सदस्यांचीही नाराजी सत्तेच्या विरोधात आहे.