मतदारांची नावे गायब, एकाच कुटुंबाचे चार ठिकाणी मतदान; ठाणेकरांना आयोगाच्या ढिसाळ कामामुळे प्रचंड मनस्ताप
By अजित मांडके | Published: May 21, 2024 01:18 PM2024-05-21T13:18:12+5:302024-05-21T13:18:44+5:30
यावेळी इतका मनस्ताप होऊनही मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचे श्रेय ठाणेकरांच्या उत्साहाला असेल. मात्र जर टक्केवारी घटली त्याचे अपयश निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कामकाजाला जाईल.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात अनेक मतदारांची नावे गायब असल्याने तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याने ठाणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. प्रचंड उकाडा, मतदान केंद्रांवरील रांगांमध्ये दोन ते तीन तासांची प्रतीक्षा यामुळे वृद्ध, महिला मतदार अक्षरश: मेटाकुटीला आले. ठाणे लोकसभेसाठी २०१९ च्या निवडणुकीत ४९.३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी इतका मनस्ताप होऊनही मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचे श्रेय ठाणेकरांच्या उत्साहाला असेल. मात्र जर टक्केवारी घटली त्याचे अपयश निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कामकाजाला जाईल.
ठाण्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र घोडबंदर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शास्त्रीनगर आदी भागांतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विखुरल्याचे लक्षात आले. एकाच पत्त्यावर वास्तव्य करणाऱ्यांचे मतदान दोन कि.मी.च्या अंतरामधील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर कसे, असा सवाल मतदारांनी अधिकाऱ्यांना केला. मात्र त्यांना उत्तर देता आले नाही. घरातील वृद्ध व्यक्तीचे मतदान एका केंद्रावर तर तिला घेऊन येणाऱ्या तरुण व्यक्तीचे मतदान दोन कि.मी. अंतरावर असेल तर दोन्ही ठिकाणी दोन ते तीन तास थांबून मतदान करायचे का, असा संतप्त सवाल मतदारांनी केला. घोडबंदरच्या हिरानंदानी पोतदार शाळेतील मतदान केंद्र व सरस्वती शाळा मतदान केंद्रावरील अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती. अनेक मतदार ३५ ते ४० वर्षे याच ठिकाणी मतदान करत असतानाही त्यांची नावे गायब होती.
मतदान संथगतीने
ठाण्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान संथ गतीने सुरू होते. एकेका मतदाराला मतदान करायला तीन ते पाच मिनिटे लागत होती. मतदान केंद्राच्या बाहेर लागलेल्या रांगेत किमान दोन ते तीन तास उभे रहावे लागत होते. अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण करण्याची व्यवस्था नसल्याने मतदार घामाच्या धारांनी निथळत मतदान केंद्रांबाहेरील रांगात उभे होते.
गुलाबी, पिवळी, निळी मतदान केंद्रे
निवडणूक विभागाने महिलांकरिता गुलाबी, युवकांसाठी पिवळी तर दिव्यांगांकरिता आकाशी निळ्या रंगाची रंगसंगती असलेली मतदान केंद्रे उभारली होती. त्यावर मतदारांनी मतदान केले. येथे सेल्फी काढण्यासाठी मतदारांनी गर्दी
केली होती.