ठाणे पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत तिघांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:34 AM2020-02-28T00:34:33+5:302020-02-28T00:34:36+5:30
सिंग, डुंबरे, बुरडे चर्चेत; नियुक्तीकडे ठाणेकरांचे लक्ष
- अजित मांडके
ठाणे : मुंबईत पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे वारे वाहत असताना आता ठाण्यातही ते वाहू लागले आहेत. पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले विवेक फणसळकर यांच्या बदलीची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू झाली असून त्यांच्या जागी तिघांची नावे आघाडीवर आली आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी यापूर्वी ठाणे पोलीस दलाचे कामकाज हाताळले आहे.
राज्य शासनाकडून गेल्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांत अनेकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात आता मुंबईपाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. फणसळकर यांनी ३१ जुलै २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. येत्या जुलै महिन्यात त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच आता त्यांच्या बदलीची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारकडून मर्जीतील मंडळींची वर्णी विविध ठिकाणी लावली जात आहे. याचाच एक भाग म्हणून फणसळकर यांच्याही बदलीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी आता सर्वात आघाडीवर असलेले नाव बिपिनकुमार सिंग यांचे आहे, सध्या ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या खालोखाल आशुतोष डुंबरे यांचेही नाव आघाडीवर आले असून ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून अॅण्टी करप्शन ब्युरोमध्ये काम पाहत आहेत. त्यांनीही यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून ठाण्यात काम पाहिले आहे. प्रशांत बुरडे हे सुद्धा सध्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत असून त्यांचेही नाव आता आघाडीवर आहे. त्यांनीसुद्धा यापूर्वी ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे विभागासाठी काम पाहिले आहे. आता या तिघांपैकी कोणाची निवड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गुन्हेगारीवर अंकुश
शांत स्वभावाचे असलेले विवेक फणसळकर यांनी आपला कार्यकाळ फारसा गाजवला नसला, तरी अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास लावण्याच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश बसवण्यातही त्यांना यश आले आहे.