सेंट्रल पार्कचे नमो द ग्रँड सेंट्रल पार्क नामकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
By अजित मांडके | Published: February 8, 2024 06:27 PM2024-02-08T18:27:02+5:302024-02-08T18:27:17+5:30
ढोकाळी येथील देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेजचा शुभांरभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचे नमो द ग्रँड सेंट्रल पार्क असे नामकरण करण्यात यावे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या मतदार संघात हे भव्य सेंट्रल पार्क बांधण्यात आले असून या पार्कचे नमो सेंट्रल पार्क असे करण्यात यावे अशी मागणी आमदार केळकर यांनी या कार्यक्रमातच केली.त्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी या नावाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात नावलौकिक केला आहे. त्यामुळे ठाण्यातील या सेंट्रल पार्क हे नाव दिल्यास ठाण्याची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोलशेत या ठिकाणी टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून २० एकर मध्ये हे ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे. या पार्कचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर,शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पार्क ठाण्यातील लोकांना पार्कचे महत्व पटवून सांगितले. शहरात आज ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची गरज असून हे पार्क ऑक्सिजन देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल न बिघडवता सरकारच्या वतीने सर्व प्रकल्प राबवले जात आहेत. २२ किमीचा शिवडी नाव्हा शिवा प्रकल्प हे उदाहरण असून या प्रकल्पात फ्लेमिंगो पळून जातील असा काही जण म्हणाले होते. मात्र अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प करण्यात आला असून यामध्ये फ्लेमिंगो दुप्पट झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यात एवढे मोठे सेंट्रल पार्क उभे राहिले आहे कि इकडच्या लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही. राज्यातील सर्वात मोठे सेंट्रल पार्क हे ठाण्यात झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांने यावेळी सांगितले. ठाणे विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सेंट्रल पार्कच्या माध्यमातून ठाणेकरांना फार मोठी पर्वणी मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या सेंट्रल पार्कला नमो सेंट्रल पार्क असे नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बांबू कधी कधी कुठे कुठे लागतात...
ठाण्यात बांबूची लागवड करा अशी सूचना करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू कधी कधी कुठे कुठे लागतात असे विधान केल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकाच हशा पिकला. मात्र त्यानंतर माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका असे सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विषयांतर केले.
देखभाल दुरुस्ती कल्पतरूकडेच...
ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेले हे सेंट्रल पार्क कल्पतरूच्या वतीने टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधण्यात आले असून उदघाटना नंतर ठाणे महापालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहे. मात्र या पार्कच्या देखभालीसाठी निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र उदघाट्नाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कल्पतरूलाच देखभालीचा ठेका देण्यात आला असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत .
स्नो पार्कची पुन्हा घोषणा...
ठाण्यात स्नो पार्कची काही वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प अद्याप कागदरावरच असून त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ठाण्यात स्नो पार्क उभारण्यात यावे अशी सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची पावले - शिंदे
पूर्वी शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, परंतु आता शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शैक्षणिक क्षेत्रात राज्य शासनाकडून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यात आले असून सध्याही सुरु आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगाशी टक्कर देण्यासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील शाळा मॉडेल केल्या जात आहेत, काळाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ढोकाळी येथील देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेजचा शुभांरभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.