२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:38 AM2020-09-17T11:38:48+5:302020-09-17T11:41:41+5:30

कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली.

Narayan Pawar's objection to buying a municipal 21 thousand bedsheets for Corona | २१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

Next

ठाणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना सेंटर व क्वारंटाईन सेंटरसाठी २७ हजार उशी कव्हर, २१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल, १८ हजार नॅपकीन, १४ हजार बादल्या, ३ हजार कचऱ्याची सुपडी, १ हजार गूडनाईट मशीन, १ हजार कंगव्यांबरोबरच २ हजार बॉलपेन आदी साहित्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जंबो खरेदी केली आहे. अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १५ हजारांच्या नऊ लाखांच्या ऑफिसर्स चेअर्स खरेदी करण्यात आल्या. तर क्वारंटाईन केंद्रातील अन्नपुरवठा, मृतदेहांची वाहतूक, कचरा वाहतूक आदींचीही कोट्यवधींची बिले अदा झाली आहेत. खर्च अवाढव्य पण रुग्णांना फायदा काय, अशी ठाणे शहरातील स्थिती आहे. दरम्यान, या संपूर्ण खरेदी व मान्यता प्रस्ताव उद्या शुक्रवारी वेबिनार महासभेत मांडण्यात येणार असून, त्याला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. संबंधित वस्तूंची खरेदी झाली आहे का, याबाबत त्रयस्थ संस्थेकडून थेट तपासणी करण्याबरोबरच दोषी अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.

कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली. विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनमानी पद्धतीने भावआकारणी झाली. उशी-३३५ रुपये, बेडशिट- २७७, सोलापूर चादर-३७५, सतरंजी - ३७५, मोठा टॉवेल -१९४, नॅपकीन - ५९, उशीचे कव्हर - ५१, प्लास्टिक स्टूल - ४४९, मोठी बादली - ३७८, छोटी बादली-९१, कंगवा -१८ रुपये आदी साहित्याची खरेदी केली. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच १ कोटी २९ लाखांची अवाढव्य खरेदी झाली. त्यानंतर कालांतराने वेळोवेळी वस्तूंची खरेदी झाली. आता थेट महासभेची मान्यता घेण्याचा प्रस्ताव दाखल झाला. या प्रकरणी मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय असून, संबंधित वस्तूंचा दर्जा व वस्तू घेतल्या होत्या का आदींची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

अधिकाऱ्यांसाठी नऊ लाखांच्या खुर्च्या!

आपत्तीच्या काळात कमीतकमी खर्चावर कारभार चालविला जातो. मात्र, ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या तब्बल ४५ ऑफिसर्स चेअर्स खरेदी केल्या. त्यापोटी पालिकेने सुमारे ९ लाख रुपये भरले. तर दोन लाखांचे १६ टेबल खरेदी करण्यात आले.

मृतदेह वाहतूकीसाठी ७८ लाखांचे कंत्राट

कोरोना बळींच्या मृतदेहाची रुग्णालय वा घरातून स्मशानभूमीपर्यंत वाहतूक करण्यासाठी शववाहिका व मनुष्यबळासाठी १८ मे ते ३१ ऑगस्ट या काळात तब्बल ७८ लाखांचे टेंडर देण्यात आले. अवघ्या १०६ दिवसांसाठी हा खर्च आहे. २० मार्चपासून दोन महिने व सप्टेंबर महिन्याचा हिशोब धरल्यास हा आकडा एक कोटींवर जाईल. दर दिवसाला साधारण ७४ हजार रुपये खर्च केवळ मृतदेह वाहतुकीसाठी झाला. संबंधित आकडे संशयास्पद आहेत, असा आरोप नारायण पवार यांनी केला आहे.

कोट्यवधी रुपयांचे भोजनबिल

भाईंदरपाडा, भाईंदरपाडा सी विंग, हाजूरी, कासारवडवली, दोस्ती-कौसा येथील पाच विलगीकरण केंद्रातील महिनाभराचे बिल तब्बल २ कोटी १० लाखांपर्यंत गेले. नास्ता, दोन चहा, दोन्ही वेळचे जेवण आणि पाण्याच्या एका बाटलीसाठी कंत्राटदाराने २८० ते ३७८ रुपयांपर्यंत आकारणी केली. या बिलांमध्ये विशेष कोविड हॉस्पीटल, होरायझन स्कूल, कौसा स्टेडियम आदींमधील बिलांचा समावेश नाही. गेल्या सहा महिन्यांचा हिशोब केल्यास केवळ जेवणासाठी कोट्यवधी रुपये पालिकेने मोजले आहेत, यााकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

पीपीई किट, मास्कच्या अफाट किंमती

महापालिकेने खरेदी केलेल्या ५५०० पीपीई किटची माहिती प्रस्तावात देण्यात आली. त्यात १३ मार्च रोजी ६६० रुपयांना, तर १५ एप्रिल रोजी एन-९५ मास्कसह पीपीई किटची ७३५ रुपयांना खरेदी केल्याची नोंद आहे. तब्बल ८ हजार २०० एन-९५ मास्कही बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी झाल्या. १३ मार्च रोजी ६२ रुपयांना मिळालेला मास्क, ३ एप्रिल रोजी ६८ रुपयांना खरेदी केला गेला. १८ मार्च रोजीच सुमारे २२ लाख मोजून दीड लाख थ्री प्लाय सर्जिकल मास्क खरेदी करण्यात आले.

थर्मल गन २९०० रुपयांना

महापालिकेने जून महिन्यात प्रत्येकी ५०० हून अधिक थर्मल गन  व ऑक्सिमीटर खरेदी केल्या आहेत. थर्मल गनसाठी २५०० ते २९०० आणि ऑक्सिमीटरसाठी सुमारे १५०० रुपये मोजण्यात आले. एकाचवेळी किती थर्मल गन व ऑक्सिमीटर आवश्यकता आहे. त्याचा वापर कोण करणार आहे, याचा आढावा न घेताच खरेदी केली गेली.

एक कंत्राटदार, वेगवेगळे दर

क्वारंटाईन सेंटरसाठी बेड, मॅट्रेस, कार्डबोर्ड बेडची खरेदी करण्यात आली. या खरेदीतील बेड व गाद्यांचा दर्जा तपासण्याची गरज आहे. एकाच कंत्राटदारांने एकाच वस्तूंसाठी वेगवेगळे दर लावल्याचेही प्रस्तावात उघड झाले आहे. 

कचरा निर्मूलनासाठी एक कोटी

कोरोना रुग्णांचा कचरा निर्मूलनासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्चासाठी मान्यता मागण्यात आली. प्रत्यक्षात आपत्तीच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये वेळेत कचरा उचलला गेला नाही. खाजगी व्यक्तींच्या साह्याने रुग्णांनी भूर्दंड सोसून कचऱ्याची विल्हेवाट लावली होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

दहा लाखांचे सॅनिटायझर

महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ३ एप्रिल रोजी दहा लाखांचे प्रत्येकी पाच लिटरचे ५०० जॅर खरेदी करण्यात आले. नामांकित कंपन्यांचे जॅर दोन हजार रुपयांना उपलब्ध असताना, एकाच वेळी दुय्यम कंपनीचे जॅर खरेदीची लगीनघाई दाखविण्यात आली. दुय्यम दर्जाच्या सॅनिटायझरमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे, असा आरोपही नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

त्रयस्थ संस्थेकडून चौकशी, अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची नारायण पवार यांची मागणी

कोरोना आपत्तीत खर्च अफाट केला. पण रुग्णांना काहीही उपयोग नाही. काही रुग्ण तडफडून मेले. मात्र, त्याचे महापालिकेला सोयरसुतक नाही. कोरोनानिमित्ताने दिवाळीसारखी बेड-मॅट्रेससह हजारो किरकोळ वस्तूंची खरेदी केली गेली. वैद्यकिय वस्तूंचा तुटवडा असताना, मार्चमध्ये जादा दराने वस्तू खरेदी झाल्या. त्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. संबंधित वस्तूंचा वापर कोणी व कधी केला, वस्तूंचा दर्जा, अदा केलेला दर, प्रत्यक्षातील गरज आदींबाबत त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करावी. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. रुग्णांना कंगवे, कर्मचाऱ्यांसाठी पेन आदी उदाहरणे म्हणजे केवळ पैसे हडपण्याचे निमित्त होते, असा आरोपही पवार यांनी केला.

Web Title: Narayan Pawar's objection to buying a municipal 21 thousand bedsheets for Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.