नरेंद्र मेहता आउट, रवींद्र चव्हाण इन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:22 AM2020-03-06T01:22:27+5:302020-03-06T01:22:30+5:30
मेहता, चव्हाणांच्या तसबिरी लावणा-या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या तसबिरी मात्र दालनात लावलेल्या नाहीत.
भाईंदर : वादग्रस्त व्हिडीओ क्लिपनंतर बलात्कार व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या तसबिरी महापालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या दालनातून काढून टाकण्यात आल्या आहेत. तर, मेहतांच्या तसबिरींची जागा आता प्रभारी तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. मेहतांच्या पालिकेतील तसबिरींवरून तक्रारी झाल्या होत्या. मेहता, चव्हाणांच्या तसबिरी लावणा-या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या तसबिरी मात्र दालनात लावलेल्या नाहीत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असलेल्या मेहतांचा विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरकरांनी पराभव केला. आमदार नसतानाही भाजपच्या पदाधिकाºयांनी दालनांमध्ये मेहतांच्या तसबिरी लावल्या होत्या. या पदाधिकाºयांनी महापुरुषांच्या तसबिरी सन्मानाने लावण्याऐवजी मेहतांच्या तसबिरी लावल्या होत्या.
दरम्यान, आधीच काहीशी कुणकुण लागल्याने मेहतांनी पक्ष व राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र, दोन दिवसांनी त्यांचा भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांसह नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांसोबतचा फोटो आला. महत्त्वाचे म्हणजे भाजपने अजूनही मेहतांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे नेते मेहतांसोबत असल्याचे मानले जाते.
शिवसेना, कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन महापौर आदी पदाधिकाºयांच्या पालिकेतील दालनात लावलेल्या मेहतांच्या तसबिरी काढण्याची मागणी केली. पदाधिकाºयांवर कारवाई करा, असे सांगितले. महापुरुषांच्या तसबिरी न लावणाºया भाजप पदाधिकाºयांसाठी वादग्रस्त असलेले मेहता हे आदर्शच नव्हे, तर राजकीय मायबाप असल्याची टीका काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी केली. सचिवांची ही जबाबदारी असून ते गैरकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता. मेहतांच्या क्लिप, बलात्काराचा गुन्हा आदी प्रकारांमुळे आधीच कोंडी झालेल्या भाजपला पालिका दालनातून मेहतांच्या तसबिरी काढाव्या लागल्या. आता मेहतांच्या तसबिरींची जागा भाजपचे प्रभारी चव्हाण यांनी घेतली आहे.
>भाजपच्या जाहिरातींवर मेहताच नेते
महापालिका मुख्यालयातील मेहतांच्या तसबिरी काढण्यात आल्या असल्या, तरी शहरात लावण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातींवर मात्र स्थानिक नेते म्हणून मेहताच आहेत. शिवाय, सोशल मीडियावरही अनेक भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांकडून मेहताच नेते असल्याचे दाखवले जात आहे.