नरेंद्र मेहतांचेसुद्धा, ए लाव रे तो व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:42 PM2019-04-24T23:42:46+5:302019-04-24T23:44:04+5:30

मोदी आधी काय म्हणाले होते, त्याचे व्हिडीओ सभेत दाखवून भाजपची झोप उडवून देणाऱ्या ठाकरे यांचे ए लाव रे तो व्हिडीओ, हे वाक्य सध्या फॉर्मात आहे.

Narendra Mehta's also, Awaav Ray! | नरेंद्र मेहतांचेसुद्धा, ए लाव रे तो व्हिडीओ!

नरेंद्र मेहतांचेसुद्धा, ए लाव रे तो व्हिडीओ!

googlenewsNext

मीरा रोड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. मोदी आधी काय म्हणाले होते, त्याचे व्हिडीओ सभेत दाखवून भाजपची झोप उडवून देणाऱ्या ठाकरे यांचे ए लाव रे तो व्हिडीओ, हे वाक्य सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे मनसेचे निवडणूक रिंगणात उमेदवार नसतानादेखील भाजपकडून ठाकरेंवर आरोप सुरू झाले आहेत. आता मीरा-भार्इंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांनीही सोशल मीडियावर ठाकरे यांच्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ’चे अनुकरण चालवले आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप आणि त्यावर स्वत:चे प्रत्युत्तर आपल्या फेसबुक वॉलवर मेहता टाकत आहेत.

देशाला वाचवायचे असेल तर मोदी-शहा यांना घरी बसवा, असे आवाहन राज ठाकरे हे राज्यभर घेत असलेल्या जाहीर सभांमधून करत आहेत. त्यासाठी मोदी आधी काय बोलायचे आणि आता काय बोलतात व करतात, याचे व्हिडीओ ते भरसभेत दाखवत आहेत. जवानांपेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त साहस असल्याचे मोदींचे वक्तव्य, जवानांना हवाईमार्गे नेण्याची व घातपाताची माहिती गुप्तचर यंत्रणांनी देऊनसुद्धा सरकारच्या दुर्लक्षामुळे पुलवामात शहीद झालेले ४० जवान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी मोदींची जवळीक यासह अनेक मुद्यांवर ठाकरे यांनी पोलखोल चालवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह भाजप-सेनेने ठाकरेंवर आरोपाच्या फैरी झाडतानाच सोशल मीडियामधूनही टीका चालवली आहे.

ठाकरे यांच्या ए लाव रे तो व्हिडीओची सध्या सोशल मीडिया, प्रसिद्धिमाध्यमांपासून सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यांचे वाक्य एवढे चर्चेत आहे की, ए लाव रे तो व्हिडीओ लिहिलेले टी-शर्टही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. ठाकरे यांनी आणलेल्या प्रचाराच्या नव्या प्रभावी माध्यमाची क्रेझ वाढत असून मीरा-भार्इंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांनीसुद्धा ए लाव रे तो व्हिडीओचे अनुकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केले आहे.

मेहता हे काँग्रेसचे माजी आमदार आणि येणाºया विधानसभा निवडणुकीत त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या मुझफ्फर हुसेन यांच्याविरोधात आपल्या फेसबुक पेजवर लाव रे व्हिडीओने प्रहार करत आहेत. मुझफ्फर यांनी मोदींसह मेहतांवर एका जाहीर सभेतून टीकेची झोड उठवली होती. १८ एप्रिल रोजी आपल्या फेसबुकवर ती व्हिडीओ क्लिप दाखवत मेहतांनी मुझफ्फर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर, मंगळवारी रात्री मेहतांनी फेसबुकवर मुझफ्फर यांच्या प्रचारसभेतील भाषणाची आणखी एक क्लिप दाखवत त्यावर आपली भूमिका मांडतानाच टीकेची झोड उठवली. मुझफ्फर यांची क्लिप दाखवल्यानंतर त्याला उत्तर देताना मेहता हे हिंदीतून अभी आपने जो व्हिडीओ देखा, अशी सुरुवात करतात.

लोकसभेची निवडणूक असली, तरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मेहता व मुझफ्फर यांच्यात आतापासूनच रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे. मुझफ्फर यांच्या भाषणातील मुद्दे, आरोप, टीका नेमकी हेरून ती क्लिप दाखवत त्याला उत्तर देण्याचे काम सध्या मेहतांनी चालवले आहे. इतकेच नव्हे, तर मुझफ्फर यांचे शहरात कुठेही भाषण असेल, तर त्याचा व्हिडीओ गोळा करण्याची जबाबदारी काहींना देण्यात आली आहे. व्हिडीओ मिळाला की, त्यातील वाक्यांची पडताळणी करून काय व कसे प्रत्युत्तर द्यायचे, यावर खलबतं होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Narendra Mehta's also, Awaav Ray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.