नरेंद्र मोदी यांना विकासाबाबत काय झाले याचा जाब विचारण्याचा हक्क आहे- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:58 PM2019-04-26T22:58:58+5:302019-04-26T22:59:44+5:30
गुजरात माॅडेलच्या नावाखाली देशाला विकासाचे माॅडेल बनविण्याच्या नावाखाली सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांना विकासाचे काय झाले, याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हा आम्हाला आहे.
ठाणे - गुजरात माॅडेलच्या नावाखाली देशाला विकासाचे माॅडेल बनविण्याच्या नावाखाली सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांना विकासाचे काय झाले, याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हा आम्हाला आहे. पण नरेंद्र मोदी विकासाबाबत बोलण्याचे टाळून राष्ट्रवादीच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावित आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
महाआघाडीचे उच्चशिक्षित उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अरुण गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, रिपब्लिकन नेते गंगाराम इंदिसे, मनोज शिंदे, संजीव नाईक, सुभाष कानडे, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, भैय्यासाहेब इंदिसे, महेश तपासे, प्रकाश गजभिये, सुहास देसाई, विक्रांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गुजरातप्रमाणे हे विकासाचे माॅडेल देशात निर्माण करुन असल्याचा प्रचार केल्याने लोकांमध्ये मंतरलेले चित्र निर्माण केले गेले. यामुळे 300 च्या वर जागा निवडून आल्या. पण गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा, कष्टकरी, दलित, आदिवासी या घटकांच्या विकासाबद्द्ल नरेंद्र मोदी अवाक्षर काढत नाहीत. उलट जम्मू काश्मीरमधील पुलावामा येथील जवानांच्या हत्येबद्दल बोलून, गांधी कुटुंबीय -शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेऊन, राष्ट्रवादीच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावून मते मागताना दिसतात. पंतप्रधानपद हे इन्स्टिटय़ूट असल्याने त्याची प्रतिष्ठा ठेवतानाच गेल्यावेळी दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचे काय झाले याचा लेखाजोखा मागण्याचा, त्यावर भाष्य करण्याचा, जाब विचारण्याचा हक्क तुम्हा आम्हाला आहे असे शरद पवार यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, मी मैदानातून पळ काढला, असे उद्धव म्हणत आहेत. पण, मी 14 वेळा निवडणूक लढून जिंकलो आहे. एकदाही पराभूत झालेलो नाही. बाबा तू एकदा मैदानात उतर. निवडणूक लढून दाखव. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मैदान मला माहित आहे. तुम्ही एकदा तरी मैदानात उतरा. या ठाण्यावर पी सावळाराम, खंडू रांगणेकर, विमल रांगणेकर यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र, आताच्या सत्ताधार्यांनी ठाण्याचा रागरंगच बदलून टाकला आहे. ठाण्याला विकासापासून दूर नेण्याचे काम केले आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ठाण्यातून आम्हाला मिळणारी माहिती ही ‘आनंद’दायीच आहे. यावेळी ठाणेकर चांगल्या चेहर्याला आणि स्वच्छ हातांना मतदान करणार आहेत. गेल्या काही वर्षात आनंद परांजपे यांनी रेल्वे, पाणी, पालिका आदी ठिकाणी प्रभावी लढाई लढली आहे. ही लढाई त्यांनी स्वच्छपणे लढली आहे. त्यामुळेच त्यांना मतदारांच्या आशीर्वादाचा हक्क आहे. गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक वेगळी आहे. आपले पंतप्रधान आपल्या भाषणांमध्ये गेल्या पाच वर्षात काय केले, हे सांगतच नाहीत. पुढील पाच वर्षात काय करणार हेही सांगत नाहीत. सन 2014 मध्ये जी आश्वासने दिली ती अद्यापही पूर्ण केलेली नाहीत. आताही त्यावर काही बोलत नाहीत. केवळ महाराष्ट्रात येऊन शरद पवारांना व्यक्तीगत टीका करीत आहेत. ही टीका करण्यामागे त्यांना माहित आहे की 2019 मध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळेच इतर पक्षांना एकत्र करण्याची ताकद असणार्या शरद पवार यांना ते लक्ष्य करीत आहेत. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने ते मते मागत आहेत.
सन 2008 मध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे हे लोकांना चिथावणी देत होते. मात्र, आम्ही कायदेशीर मार्गाने कसाबला फाशी दिले. त्यामुळेच 2008 ते 2014 या काळात पाकिस्तानची भारताकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत झाली नाही. मात्र, 2014 नंतर पठाणकोट, उरी, पुलवामा असे दहशतवादी हल्ले झाले. हे हल्ले होण्यामागे भाजपचे पाकप्रेमच कारणीभूत आहे. पाकमध्ये जाऊन अडवाणींनी जिनांची स्तुती केली होती. जसवंतसिंह यांनी जिनांचे उदात्तीकरण करणारे पुस्तक लिहिले होते. 1999 ला तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी पाकला भेट दिली होती. त्यांनीच मुशर्रफ यांना आग्र्याला बोलावले होते. मोदींनी शपथविधीला नवाज शरीफला बोलावले होते. आयएसआय चीफला लष्करी तळ यांनीच दाखवला होता. त्यामुळेच असे हल्ले झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात, सेनेवाले म्हणत आहेत की आम्ही परांजपेंची अनामत रक्कम जप्त करुन दाखवू; माझे त्यांना आव्हान आहे की तसे झाले तर आपण राजकारण सोडून देऊ. आनंद परांजपे हे शंभर टक्के विजयी होणार आहेत. कारण, आनंद परांजपे हे निवडणूक केवळ प्रतिनिधी म्हणून लढवत आहेत. खर्या अर्थाने ही निवडणूक गणेश नाईकच लढवत आहे. सध्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये अहंकार वाढला आहे. त्यांचा हा अहंकार आपण मोडीत काढणार आहोत. आपली सत्ता आल्यानंतर आपण मीरा-भाईंदर, ठाणे-कल्याणसाठी दोन धरणांची उभारनी करणार आहोत, असे सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारीला गुप्तचर खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही सैन्यतुकडी जात असताना पुलावामा येथे 78 गाड्यांच्या ताफ्यात 350 किलो आरडीएक्स असलेली इनोव्हा गाडी घुसलीच कशी? यावेळी सैनिकांच्या मृत्यूची जबाबदारी न घेता त्याचे निवडणूक प्रचारात वापर करुन जनतेच्या भावना नरेंद्र मोदी भडकावित आहेत. फॅसिझमचा हिटलरनंतर सर्वात भिषण चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. कोणताही हुकूमशहा हा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत येतो. नरेंद्र मोदी हिटलरप्रमाणे सत्तेत येऊन हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे भारताचे संविधान वाचविण्यासाठी नरेंद्र मोदी नावाच्या हिटलरला रोखण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावेळी अरुण गुजराथी यांनी , आनंद परांजपे हे आनंद देणारे व्यक्तीमत्व आहे. चेहरा जेवढा गोंडस आहे. तेवढेच हृदयही कोमल आहे. मॅन ऑफ दि मिलेनियम म्हणून आनंद परांजपे यांचा गौरव करायला हवा, असे म्हटले.
रिपाइं एकतवादीचे नानासाहेब इंदिसे यांनी सांगितळे की, या देशात अघोषीत आणीबाणी लादली जात आहे. 9 ऑगस्ट 2018 रोजी ज्यावेळी संविधान जाळण्यात आले आणि बाबासाहेबांच्या बद्दल अर्वाच्च भाषा वापरली गेली. त्याचवेळी या देशातील संविधानाला मोठा धोका निर्माण झाला होता. म्हणूनच मी कळवळीची विनंती करतो की आनंद परांजपे यांना संसदेत पाठवणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी महाआघाडीला सत्तेवर बसवले पाहिजे.