"मोदींनी 'या' २० प्रश्नांची उत्तरे द्यावीत...", महाविकास आघाडीचे आव्हान
By अजित मांडके | Published: October 4, 2024 05:02 PM2024-10-04T17:02:18+5:302024-10-04T17:02:49+5:30
ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.
ठाणे : मागील अडीच वर्षात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाला आहे. आता यापुढे कर्ज देखील घेता येणार नसल्याचे सांगत महाराष्ट्राची इज्जत ही गुजरातला गहाण ठेवली गेल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी केवळ याच प्रश्नाचे उत्तर न देता राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे आदींसह २० प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी कॉंग्रसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई, उध्दव सेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शनिवारी मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भुमीपुजन, लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न केले असून त्यांची उत्तरे द्यावीत असे यावेळी सांगण्यात आले. त्यातही जी जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही, त्या वास्तुचे भूमिपूजन मोदी करणार असल्याचेही आव्हाड म्हणाले.
राज्य गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात देखील वाढ झाली, त्यामुळे राज्यातील मुली, महिला सुरक्षित आहेत का?, मागील १० वर्षात राज्यातील २० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, या खोके सरकारमध्ये ८ पेपर गळती आणि घोटाळे झाले. तलाठी घोटाळा देखील गाजला आहे, तुमच्या पक्षाने महाराष्ट्राला १ ट्रिलियन यूएस डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिले होते, मात्र ट्रीपल इंजिन सरकारने ते साध्य का केले नाही?, राज्यातील युवकांना १ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. परंतु १२ हजार सुध्दा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि बल्क ड्रग पार्कसारख्या मोठ्या प्रकल्पांना राज्याबाहेर का घेऊन गेलात? ७ लाख कोटींचा तोटा आणि ४ लाख भूमी पुत्रांच्या नोकऱ्या गेल्याबद्दल तुम्ही उत्तर कधी देणार?, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व २७ महापालिका निवडून न आलेल्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. तुमच्या सरकारने निवडणूक न घेऊन लोकशाहीचा गळा का घोटला?, महायुतीच्या नेत्यांकडून स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातोय, मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे असूनही महिला विरोधी गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारने मान्यता दिली होती, तरी आता केंद्र सरकार का टाळाटाळ करत आहे?, बदलापूरच्या अमानवी घटनेचा आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला, पण तुषार आपटेचे काय? तो भाजप पदाधिकारी आहे म्हणून त्याला वाचवत आहात का?, दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मागार्संदर्भात अजून किती खोटी आश्वासने देणार?, पोलिस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडला अजूनही निलंबित का केले नाही?
कधीपर्यंत टोरेन्ट कंपनीच्या माध्यमातून मुंब्रा व भिवंडीकरांची आर्थिक पिळवणूक करणार, भिवंडी रेल्वे मागार्ला मध्य रेल्वे मागार्शी जोडण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, ते पूर्ण का केले नाही? मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील आदिवासींच्या घरातील पाण्याची समस्या कधी दूर होईल, देशातील २५% कापड उत्पादन करणाऱ्या भिवंडी शहरात आज यंत्रमाग उद्योगाचा ऱ्हास होत आहे, लघुउद्योजकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार का पाऊल उचलत नाही? असे तब्बल २० प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले असून त्याची उत्तरे महाविकास आघाडीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागितली आहेत.