प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी - सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 09:35 PM2019-04-20T21:35:36+5:302019-04-20T21:36:19+5:30
शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल हिंदूत्ववादी अतिरेकी असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शहीदांचा अपमान झाला आहे.
कल्याण - शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल हिंदूत्ववादी अतिरेकी असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शहीदांचा अपमान झाला आहे. त्याना भाजपाने उमेदवारी दिली आहे. एकीकडे प्रज्ञा सिंह यांच्याकडून शहीदांचा अपमान केला जात आहे. तर दुसरीकडे मोदी हे विकासाच्या कामावर नाही तर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागत आहे. सिंह यांच्या वक्तव्यप्रकरणी भाजपने सिंह यांचे वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत वक्तव्य असल्याचे सांगून पाठराखण केली आहे. या प्रकरणी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांची माफी मागवी. अन्यथा ही जनता या निवडणूकीत भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज येथे केले.
कल्याण स्पोर्ट कॉम्पलेक्स येथे भिवंडी मतदार संघातून काँग्रेस आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज शनिवारी सायंकाळी चार वाजता करम्यात आले होते. यावेळी प्रवक्ते सावंत यांनी उपरोक्त विधान केले. याप्रसंगी उमेदवार टावरे यांच्यासह मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो, काँग्रेसच्या नेत्या अलका आवळसकर, आर. बी. सिंह, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, मनसेचे पदाधिकारी काका मांडले, उर्मिला तांबे, इरफान शेख, उल्हास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी सांगितले की, प्रज्ञा सिंह यांच्या तोंडातून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत आहे. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत होऊ शकत नाही. प्रज्ञाला उमेदवारी दिली जाते. भविष्यात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेक:यांना भाजप उमेदवारी देऊ शकतो. यात काही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही. इतकेच काय महात्मा गांधीचे मारेकरी असलेले नथूराम गोडसे हे जर जिवंत असते तर त्यांनाही भाजपने या निवडणूकीत उमेदवारी दिली असती अशी टिका सावंत यांनी केली आहे.