खड्डे बुजवण्यासाठी देणार ५० लाख- नरेंद्र पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:26 AM2018-08-21T03:26:57+5:302018-08-21T03:27:16+5:30
वाहतूककोंडी फोडण्यावर भर देण्याच्या सूचना
डोंबिवली : खड्डे भरण्यास निधी कमी पडत असेल, तर आमदार निधीतून ५० लाखांचा निधी देण्याची तयारी असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. खड्डे भरण्यासाठी पीआयसीसी या नव्या आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
कल्याणमधील रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीची समस्या, याबाबत नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार यांनी एक बैठक गुरुवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलावली होती. त्यावेळी केडीएमसी, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाही पावसाळ्यात कल्याणमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यातच मुंब्रा बायपासच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूकही कल्याणमार्गे वळवण्यात आली आहे. परिणामी, कल्याण शहरावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. तासन्तास वाहनांचा खोळंबा होत आहे. पवार यांनी वारंवार याबाबत विचारणा केली असता सर्वच यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व यंत्रणा समोरासमोर आणून तत्काळ तोडगा निघावा, या उद्देशाने बैठक घेतल्याचे ते म्हणाले.
नागरिकांच्या सहनशीलतेचा यंत्रणांनी अंत पाहू नये, असे आवाहन करत तातडीने खड्डे बुजवावेत, वाहतुकीची समस्या सोडवावी, असे आवाहन पवार यांनी केले. त्यावर, कल्याण शहरात पत्रीपूल, दुर्गाडी पूल, वालधुनी आणि शहाड येथील उड्डाणपूल या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. पुलांवरील खड्डे त्याला कारणीभूत आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर पवार यांनी लवकरात लवकर पूल आणि मुख्य मार्गांवरील खड्डे भरण्याचे निर्देश दिले. वाहतुकीच्या नियोजनासाठी आणखी वॉर्डनची गरज असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यावर पवार यांनी १० वॉर्डनचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवून त्यांची नियुक्ती तत्काळ करण्याचे आदेश दिले.
‘ते’ गतिरोधक काढा
गोविंदवाडी बायपासवर पार्किंग, अतिरिक्त गतिरोधक, यामुळे अवजड वाहने तेथून वळवण्यात अडचण होते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यावर स्थानिक रहिवाशांच्या दबावामुळे हे गतिरोधक टाकल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकांºयानी दिली. नियमानुसारच गतिरोधक असावेत. अतिरिक्त गतिरोधक हटवावेत, असे पवार म्हणाले.