नरेंद्र पाटीलही भाजपाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:02 AM2018-05-25T01:02:24+5:302018-05-25T01:02:24+5:30
मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात : माथाडी कायदा देशभर लागू करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न
नवी मुंबई : निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर माथाडी नेते नरेंद्र पाटील हेही भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू
झाली आहे. भाजपा सरकारने माथाडी कायदा देशभर लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय राज्यातील कामगारांचे
प्रश्न सोडविल्यामुळे माथाडी
नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजून किती फूट पडणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या विधान परिषदेची मुदत जुलैमध्ये संपत आहे. दोन वर्षांपासून पाटील यांनी भाजपात जाऊन पुन्हा
विधान परिषद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीला मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. गतवर्षी गणेशोत्सवामध्ये त्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे पुनरुर्जीवन करून २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. राज्यातील कामगारांचे प्रश्नही सोडविले आहेत.
माथाडी कायदा फक्त राज्यापुरता मर्यादित आहे. भाजपा शासनाने हा कायदा देशातील सर्व राज्यात लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एप्रिलमध्ये सर्व राज्याच्या कामगार मंत्र्यांची बैठक केंद्रीय कामगार मंत्र्यांनी आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये माथाडी कायदा देशभर लागू करण्यासाठी चर्चा झाली होती. शासनाने माथाडी कायदा व कामगारांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे नरेंद्र पाटील भाजपाच्या बाजूने झुकले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीमधून पुन्हा विधान परिषद मिळणार नाही. यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही अशीच स्थिती आहे. यामुळे लवकरच ते राष्ट्रवादीला राम - राम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांचा फोन बंद होता.
माथाडींची राज्यभर ताकद
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ही राज्यातील सर्वात मोठी माथाडी संघटना आहे. सातारा, सांगली, सोलापूर, पुणेमधील १० पेक्षा जास्त विधानसभेच्या मतदार संघात व रायगड, ठाणेमधील चार मतदार संघांमध्ये माथाडी कामगारांची मते निर्णायक आहेत. यामुळे भाजपानेही माथाडी नेत्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.
गणेश नाईक यांचे वेट अॅण्ड वॉच
राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक भाजपात जाण्याची चर्चा २०१४ पासून सुरू आहे. नाईक परिवारातील कोणीच याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु राज्यभर सुरू असलेल्या घडामोडींमुळे नाईकांच्या भाजपा प्रवेशाविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.