कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते - नरेश म्हस्के
By अजित मांडके | Published: October 6, 2022 07:02 PM2022-10-06T19:02:36+5:302022-10-06T19:03:10+5:30
कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीचं लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची घराणेशाही लादलेली नाही. कल्याणची लोकसभेची जागा श्रीकांत शिंदे यांनीचं लढावी. याकरिता स्वतः उद्धव ठाकरे हेच आग्रही होते. त्यामुळे ज्याप्रकारे बुधवारच्या शिवाजी पार्क येथील दसऱ्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांच्या मुलावर जी टीका करण्यात आली. त्याचा आम्ही निषेध करतो असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केले.
आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कल्याण लोकसभेच्या जागेसाठी योग्य उमेदवाराच्या शिवसेना शोधात होती. तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. काही करा पण हीं जागा जिंका अशी त्यांची तेव्हा भूमिका होती. पण तेव्हा श्रीकांत शिंदे हीं निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वांनी आग्रह केल्यामुळेचं श्रीकांत शिंदे यांनी ती निवडणूक लढवली. असे स्पष्टीकरण म्हस्के यांनी दिले. परिणामी एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही लादली असे म्हणणं चुकीचं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मुलावर जी उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ती चुकीची असून आम्ही त्याचा निषेध करतो. उद्या आम्हीही आमची पातळी सोडून बोलू शकतो. असा इशाराही म्हस्के यांनी यावेळी दिला.