स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 05:38 PM2022-08-02T17:38:47+5:302022-08-02T17:40:19+5:30
'उत्सव ७५' च्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे शहरात ठाणे महानगरपालिका व शहरातील सामाजिक संस्थांच्या विद्यमाने 'उत्सव ७५' या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्र प्रदर्शन, नृत्य, बाईक रॅली, मॅरेथॉन, बालनाट्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा अशा विविधांगी कार्यक्रमाच्या माध्यमातून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव ७५ चे स्वागताध्यक्ष व माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, मनिष जोशी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी श्रीपाद भालेराव, ॲङ स्वाती दिक्षीत, निकिता भागवत आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेदरम्यान उत्सव ७५ या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या उत्सव ७५ शहरात राबविण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी 'मान्यवर ठाणेकर नागरिकांच्या मुलाखती', 'नृत्य, 'कवी संमेलन' 'क्रांतीकारकाच्या यशोगाथा' 'संगीत जागरण' 'कराओके' कार्यक्रम, 'कम्युनिटी 'ठाणे टॉक' 'रन फॉर नेशन' ही १० कि.मी. ची 'सायकल रॅली' 'पाककला स्पर्धा' 'स्वातंत्र्यलढयात ठाण्याचा सहभाग' 'माहितीपट' १४ ऑगस्ट २०२२ ला रात्री १२ वाजता शहरातील विविध ७५ ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येणार आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वा. होणार आहे. या उपक्रमात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव ७५ चे स्वागताध्यक्ष माजी महापौर नरेश म्हस्के व अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक महितीसाठी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हात नाका येथे 'उत्सव ७५' च्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा http://utsavthane.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा तसेच विनोद शर्मा 9820403748, व श्रीपाद विनोद 8097132799 यांचेशी व्हॉटसॲप मेसेजवर संपर्क साधावा असे आवाहन ठाण्यातील सर्व संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.