नरेश म्हस्केंनी सुर्यावर थुंकू नये, आनंद परांजपे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:49 PM2023-04-01T21:49:25+5:302023-04-01T21:50:36+5:30
शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा परांजपे यांनी समाचार घेतला.
ठाणे: महाराष्ट्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने काय टीप्पणी केली आहे, यावर आधी नरेश म्हस्के यांनी बोलावे; त्यानंतरच आमच्या नेत्यांवर टीका करावी. सध्या त्यांची प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना "शाखा ताब्यात घेणारे नेते" अशीच झालेली आहे. त्यामुळे या शाखाचोराने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे. उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचेठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी चढविला.
शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा परांजपे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, सध्या म्हस्के यांची ख्याती जबरदस्तीने, पोलिसांच्या मदतीने शिवसेना शाखा ताब्यात घेणारा ‘प्रवक्ता’ अशीच झालेली आहे. शाखा ताब्यात घेण्यापासून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे असो, या कामात सध्या ते आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या मंत्रिमंडळात सहभागी झालात. नगरविकास, एमएसआरडीसीसारखी महत्वाची खाती तुमच्याकडे असताना पहिल्या दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खुर्ची कशी खेचता येईल, याचे प्रयत्न तुम्ही सुरु केले होते. याला बंड म्हणायचे की गद्दारी? हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच कळतेय. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे. सर्वोच्च न्यायालयाचीही अत्यंत घाणेरडी टिप्पणी महाराष्ट्र सरकारबद्दल आलेली आहे. त्याके लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे अशा निरर्थक टीका करुन जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरुन हटविण्याचा प्रयत्न म्हस्के हे करीत आहेत. ठाण्याचा विचार करता, आधी त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे, गद्दारीचा कट कधी रचला; सर्वोच्च न्यायालयाने काय टीप्पणी केली, उच्च न्यायालयाने काय आदेश दिलाय, याचे स्पष्टीकरण द्यावे; त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, आव्हाड यांच्यावर आरोप करावेत.
ठाण्याच्या बाहेर विश्व नसलेल्या नरेश म्हस्के यांची आता-आता महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी गेले आहेत. त्यांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये. ही थुंकी आपल्याच तोंडावर पडते, याची जाणीवही म्हस्के यांना नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला.