महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के
By अजित मांडके | Published: February 22, 2024 05:46 PM2024-02-22T17:46:20+5:302024-02-22T17:47:13+5:30
मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला.
ठाणे : जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नव्हता, तर सभागृहात तुम्ही विरोध का नाही केला. तसेच सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर दुसरी भूमिका घ्यायची हे दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. तर, दोन दगडावर पाय ठेवणारी ही मंडळी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला.
मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी दुटप्पी भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणाबाबत वेगळा काही मार्ग असेल तर तो सांगावा केवळ सल्ले देण्याचे काम करू नये. ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावी की देऊ नये हे जाहीर करावे. उगाच गोल गोल फिरून बोलू नका, येत्या दोन-तीन दिवसात राज्यपाल त्या काढलेल्या आदेशावर स्वाक्षरी करतील असेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणा बाबत घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर शरद पवार यांनी मार्गदर्शन करावे तुम्ही कित्येक वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होता, आपण मराठा आरक्षणासाठी काय केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात म्हणजेच २०१८ मध्ये हे आरक्षण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर वकील दिला नाही. त्यामुळे मराठ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे हेच असल्याचेही म्हस्के यांनी म्हटले आहे.
दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतल्यानंतर चार महिन्यात सर्वेक्षण केले, पूर्ण अभ्यास केला, वकील आणि तज्ञांचा सल्ला घेतला. असेही म्हस्के म्हणाले. आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही, आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असेही म्हस्के यावेळी म्हणाले. हे आरक्षण टिकणार असल्याचा दावा करताना ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्या होत्या, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या सरकार ने केलेले आहे.