बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी सांगावं, नरेश म्हस्केंचा राऊतांना टोला
By अजित मांडके | Published: November 16, 2022 01:32 PM2022-11-16T13:32:39+5:302022-11-16T13:32:49+5:30
बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावं, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं
ठाणे :
बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावं, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं असं प्रत्त्युत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊत यांना दिले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करत आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल वाट्टेल ते बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही असेही म्हस्के यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदसोबत संबंध असलेल्या मंत्र्याला जे आपल्या मंत्रिमंडळातून अखेरपर्यंत काढू शकले नाहीत, बाळासाहेबांना अटक करून तुरुंगात डांबणाचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत ज्यांनी मातोश्रीवर जेवणावळी झाडल्या, ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादी विचारांना कायमची मूठमाती दिली त्यांनाच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा अधिकार नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे.
वारसा हा फक्त रक्ताच्या नात्याचा नसतो तर विचारांचा देखील असतो आणि तोच विचार बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.