अरुंद रस्ते, पार्किंग व्यवस्थेची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:38 AM2020-02-02T01:38:22+5:302020-02-02T01:39:22+5:30
उल्हासनगरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.
तब्बल नऊ लाख लोकसंख्या व ७० हजारांपेक्षा जास्त वाहने असलेल्या उल्हासनगरात सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग आणि विशेष म्हणजे वाहनतळाची सुविधाच नाही. अरुंद रस्ते व वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीचे ग्रहण या शहराला लागले आहे. त्यातून ध्वनी व वायुप्रदूषणात वाढ झाल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे. मात्र, वाहतूक पोलीस व महापालिका त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरली आहे.
उल्हासनगरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था व नियत्रंणाचे काम उल्हासनगर व विठ्ठलवाडी येथील दोन वाहतूक विभाग आणि पालिकेने दिलेल्या ४५ वॉर्डनमार्फत होते. मात्र, अरुंद रस्ते व कोंडीमुळे वाहनांचा वेग १५ पेक्षा जास्त नसतो.
दुसरीकडे शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड चौक, नेहरू चौक, गोल मैदान, जपानी मार्केट, शिरू चौक, बिर्ला मंदिर परिसर, खेमानी, पवई चौक, व्हिनस चौक, कॅम्प नं-४ व ५ चे मुख्य मार्केट येथे खरेदीसाठी येणाऱ्यांच्या वाहनांची संख्याही अधिक असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
महापालिकेने स्वत:ची पार्किंग व्यवस्था विकसित केलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना खाजगी पार्किंगमध्ये जादा पैैसे देऊन वाहनांचे पार्किंग करावे लागत आहे. शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. कल्याण ते बदलापूर रस्त्याचे काम चार वर्षांपासून ठप्प आहे. तसेच रस्त्याची दुरवस्था असल्याने रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. अनेक जणांचे अपघातांत जीव गेले आहेत.
रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन शहरात सर्रास झाले असून, जागोजागी मनात वाटेल तेथे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मध्यंतरी, न्यायालयाने अवैध गतिरोधक काढून टाकण्याचे आदेश दिल्यावर महापालिकेने अनावश्यक गतिरोधक काढून टाकले. मात्र, आता पुन्हा वाहतूक विभागाच्या परवानगीविना वाटेल तेथे महापालिका अधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठेकेदाराने काही फुटांच्या अंतरावर गतिरोधक उभारले आहेत.
शहरभर दिशादर्शक नामफलक: महापालिकेने जाहिरातींचा ठेका देताना जाहिरातीच्या फलकाच्या एका बाजूला शहरातील चौक, रस्ते, मंदिर, महत्त्वाची ठिकाणे, मार्केट आदींचे नाव लिहिण्याची अट टाकली आहे. त्यानुसार, शहरातील बहुतांश भागात दिशादर्शक नामफलक असून, त्याचा फायदा शहरवासीयांना व शहरात येणाºया अनोळखी नागरिक व वाहनचालकांना झाला आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीला महापालिकेने ४५ वॉर्डन दिले असून, त्यात वाढ करण्याचे संकेत नगरसेवकांनी दिले आहे.