नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारकामुळे ऐतिहासीक वारसा जपत पर्यटनालाही चालना मिळणार - राजन विचारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:20 PM2021-08-25T17:20:44+5:302021-08-25T17:25:01+5:30
चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे .
मीरारोड - चौक येथील धारावी किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा बसवल्या नंतर आता या भागाचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार सुशोभीकरण करून स्मारक विकसित केले जाईल . यामुळे ऐतिहासिक ठेवा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचे महत्व वाढणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी परिसराच्या पाहणी दौऱ्या नंतर सांगितले .
चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे . २००३ साली महासभेत सदर आरक्षण विकसित करण्याचा ठराव मंजूर झाला होता. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय, संचालनालय यांनी बुरूज, किल्ला व सदरच्या आजूबाजूच्या परिसरातील जागा विकसित करण्यासाठी सन २००४ ला पाहणी करून स्मारक उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात बगीचा विकसित करण्यात आला.
परंतु नरवीर चिमाजी आप्पा यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता शासनाने स्थापन केलेल्या समितीकडे २००६ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव दि. १७ मार्च २०११ रोजी शासनास सादर केला. परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने कित्येक वर्ष प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. ही बाब स्थानिक शिवसेना नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिली होती . त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात बैठक आयोजित करून सुधारित प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्याची सूचना पालिकेला केली . पालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता मिळाल्याचे पत्र मीरा-भाईंदर आयुक्तांना देण्यात आले अशी माहिती विचारे यांच्या कार्यालया कडून देण्यात आली .
नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा चौक येथे बसविण्याचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या १९ वर्षापासून अडकला होता. खा . विचारे यांच्या प्रयत्नां नंतर पुतळा नुकताच बसविण्यात आला. खासदार निधीतून २५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विचारे यांनी आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद जॉर्जी, शर्मिला बगाजी सह पुतळा व परिसराची पाहणी केली . यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग, शहर प्रमुख पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उप जिल्हा संघटक विद्या कदम, उपशहर संघटक तेजस्विनी पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
स्मारकाच्या ठिकाणी जुन्या दगडांचे अवशेष आहेत त्याचे पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने जतन करा, संपूर्ण स्मारकाला संरक्षण देण्यात यावे. या स्मारकातुन वसईचा किल्ला समुद्रातून दिसण्यासाठी वाढलेल्या वृक्षांची छाटणी करावी. तसेच नव्याने आलेले वृक्ष यांचे पुनर्रोपण दुसरीकडे करण्यात यावे. पुतळ्याच्या देखभालीसाठी हायड्रोलिक यंत्रणा उभारून या ठिकाणी हायमास्ट व विद्युत रोषणाई करण्यात यावी आदी सूचना खा. विचारे यांनी केल्या.