नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात
By रणजीत इंगळे | Published: March 29, 2024 06:44 PM2024-03-29T18:44:34+5:302024-03-29T18:45:13+5:30
हेमंत गोडसे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी हेदेखील असून श्रीकांत शिंदे यांच्याशीही नाशिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
ठाणे - महायुतीतील नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाने ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. परंतु त्यात नाशिकच्या जागेचा समावेश नव्हता. ही जागा राष्ट्रवादीला द्यावी असा आग्रह अजित पवार गटाचा आहे. तर भाजपानेही आपली या मतदारसंघात ताकद असून हेमंत गोडसेंना उमेदवारी न देता भाजपाचा उमेदवार द्यावा असा आग्रह ठेवला आहे. त्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे गोडसे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहचले.
हेमंत गोडसे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी हेदेखील असून श्रीकांत शिंदे यांच्याशीही नाशिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. कालपासून गोडसे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहचलेत परंतु अद्याप ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज झालेले गोडसे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलेत. या जागेबाबत हेमंत गोडसे म्हणाले की, मतदार संघात फेरी पूर्ण झाली आहे. काम सुरू करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. शिवसेनेला १८ जागा मिळाव्यात हा आमचा आग्रह आहे. प्रत्येक पक्षाला जागेवर दावा करण्याचा हक्क आहे. माझ्या मनात धाकधुक नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हा १०० टक्के विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आजही खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. १००१ टक्के नाशिकमधून मलाच उमेदवारी मिळेल असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार हे पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत आले होते. त्यात नाशिकच्या हेमंत गोडसेंचाही समावेश होता. शिवसेनेने लोकसभेची पहिली यादी जाहीर केली. त्यात ८ जणांची नावे आहेत. त्यातील रामटेकचे कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. आणखी काही जागा शिवसेनेला मिळतील. परंतु नाशिकच्या जागेवरून भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा आग्रह कायम असल्याने अद्याप या जागेवरील उमेदवाराची घोषणा झाली नाही.
उदय सामंत आणि किरण सामंतही प्रतिक्षेत
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी गेल्या १ तासापासून मंत्री उदय सामंत आणि किरण सामंतही प्रतिक्षेत आहेत. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे सामंत बंधू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेही अर्धा तासापासून शिंदेंची वाट पाहत आहेत. सध्या श्रीकांत शिंदे यांच्या सोबत सर्व मंत्री आणि नेते चर्चा करत आहेत. मात्र सीएम कधी येणार याची कुणालाच माहिती नाही.