ठाण्यात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:08 AM2019-09-28T03:08:51+5:302019-09-28T03:09:19+5:30
२०० कार्यकर्ते नजरकैदेत : पोलिसांना चकवून दीड हजार जण रेल्वेने रवाना
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याने ठाण्यातून हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होणार होते. परंतु, यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, विविध ठिकाणांवरून सुमारे चार हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले होते. तसेच मुंबईच्या हद्दीवर नाकाबंदीही केली होती. परंतु, राष्टÑवादी कार्यकर्त्यांच्या हे आधीच लक्षात आल्याने सुमारे १५०० कार्यकर्ते सकाळीच रेल्वेने मुंबईला रवाना झाले होते. दुपारनंतर वातावरण निवळल्याने या सर्व कार्यकर्त्यांना नजरकैदेतून सोडून देण्यात आले.
काही दिवसांपासून शरद पवार यांच्याविरोधात ईडीकडून दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर स्वत: पवारच शुक्रवारी या कार्यालयात हजेरी लावणार होते. मात्र, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. असे असतानाही ‘या वेळेस आम्हाला माफ करा, तुमचे आम्ही ऐकणार नसून ईडीच्या कार्यालयाजवळ हजर राहू,’ असे टिष्ट्वट राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी सायंकाळी केले होते.
यामुळे ईडी कार्यालयाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये आणि सुरक्षेचा उपाय म्हणून ठाणे पोलिसांच्या वतीने पहाटेपासूनच मुंबईच्या दिशेने जाणाºया ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नाकाबंदी केली होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्टÑवादीच्या ठाणे शहर कार्यालयातून शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांच्यासह १५ ते २० पदाधिकारी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार तेवढ्यात कार्यालयाबाहेरच नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
४० बसची केली होती सोय
दुसरीकडे मुंबईसाठी रवाना होण्यासाठी गुरुवारीच राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत शुक्रवारची रणनीती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे शहर, कळवा आणि मुंब्य्रातून तब्बल ४० बस मुंबईला जाणार होत्या. यातून महिला कार्यकर्त्यांसह तब्बल दोन हजार पदाधिकारी मुंबईला रवाना होणार होते. मात्र, कळव्यातील आत्माराम पाटील चौकातच पोलिसांनी या बस पिटाळून लावल्या. तसेच शहरात असलेल्या बसही पिटाळल्या. परंतु, पोलीस अशा पद्धतीने कारवाई करणार हे माहीत असल्यानेच राष्टÑवादीचे सुमारे १५०० तरुण कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने सकाळीच रेल्वेने रवाना झाले होते. दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर ठाणे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडल्याचे दिसून आले. दुसरीकडे नौपाडा, कळवा, कोपरी, मुंब्रा आदींसह इतर पोलीस ठाण्यांतून सुमारे १५० ते २०० पदाधिकाºयांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. अखेर, पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि वातावरण शांत झाल्यानंतर या पदाधिकाºयांना सोडून देण्यात आले.