नावेच झाली हद्दपार
By admin | Published: February 22, 2017 06:21 AM2017-02-22T06:21:45+5:302017-02-22T06:21:45+5:30
१० जागा वाढल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या दिव्यात
ठाणे : १० जागा वाढल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या दिव्यात सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. मात्र, याद्यांमधील घोळ आणि अचानक याद्यामधून हद्दपार झालेली नावे पाहून मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दिवा पूर्वेकडील गणेश विद्या मंदिर या शाळेत व्होटिंग मशीन उलट्या-सुलट्या लावल्याने गोंधळ उडाला होता. दिव्यात शांततेत मतदान झाले. येथील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि अपंगांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांनी रिक्षांची व्यवस्था केली होती. तशीच व्यवस्था कळव्यात पाहण्यास मिळाली.
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. तेंव्हापासून दिवा पश्चिम आणि पूर्वेकडे मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. यादीतील घोळामुळे केंद्रांवर गेल्यावर कोणत्या खोलीत मतदान करायचे हे कोणी सांगत नसल्याने नागरिक वेगवेगळ्या खोल्यांसमोरील रांगेत उभे राहत होते. मतदारांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा तिसऱ्या ठिकाणी फिरावे लागले. अखेर काहीजण आपला मतदानाचा हक्क न बजावताच घरी गेले.
दिव्यात मतदान होत असताना, कळव्यात सकाळी मतदारांनी तुरळक गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले. सकाळी अकरा वाजल्यानंतर तेथे गर्दी दिसून लागली. ती दुपारी पुन्हा कमी झाली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी गर्दी केली होती. येथेही याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला.
बाहेरून स्थिरावल्यांचा प्रतिसाद
दिव्यातील स्थानिक मतदारांपेक्षा बाहेरून तेथे आलेला मतदार मतदानाकरिता हिरीरीने सरसावल्याचे दिसून आले. यामध्ये परप्रांतीय आणि मुंबईतील कोकणी माणूस दिसत होता. (प्रतिनिधी)
साडेतीन तासांनी ‘लोकमत’च्या मदतीमुळे केले मतदान
मुलुंड येथून दिव्यात राहण्यासाठी आलेल्या भानुबाई बनगकर यांचे नाव यादी होते. पण, त्याही याद्यांच्या घोळाच्या शिकार झाल्या होत्या. सकाळी त्यांचे पती आणि मुलगा मतदान करून कामावर गेले. पण, त्यांनी कामावर सुट्टी घेतल्याने त्या ९ वाजण्याच्या सुमारास गणेश विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर आल्या. मतदान कुठे करायचे याबाबत त्यांना कोणी धड सांगत नसल्याने त्या मतदानांसाठी असलेल्या रांगेत उभ्या राहिल्या.
पण, नंबर लागल्यावर त्यांचे नाव नसल्याचे त्यांना सांगण्यात आले असे चारवेळा झाल्यावर त्या हताश अवस्थेत त्याच केंद्रात उभ्या असताना, त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे विचारणा केली. यावेळी त्यांना मोबाईल अॅपवरुन त्यांची इंत्यभूत माहिती देऊन त्यांना मतदान खोल्यांपर्यंत प्रस्तुत प्रतिनिधीने नेले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्यास मिळाले.
वंचित मतदार : वारेकर विद्यालय परिसरातील शशिकांत गाडेकर तसेच बंधू जाधव या कुटुंबातील काही सदस्यांची नावे याद्यांमधून गायब झाल्याचे त्यांना मतदान केंद्रावर गेल्यावर समजले. येथे राहण्यासाठी आल्यावर २००७, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केले. पण, यंदा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली.
भूमिपुत्रांनाही मन:स्ताप : दिव्याचे भूमिपुत्र मधुकर भगत यांनाही यादीतील घोळाचा फटका बसला. सकाळी लवकर मतदानासाठी आल्यावर मात्र, तेथील यादीत नाव नसल्याने त्यांना चार ठिकाणी फिरावे लागते. अखेरीस यादीत नाव मिळाल्यावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.