बालशौर्य पुरस्कार विजेती वीरबाला हाली बरफ हलाखीत; रेशनिंगच्या अन्नधान्यापासूनही वंचित!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:24 PM2021-05-29T19:24:21+5:302021-05-29T19:29:15+5:30
Hali Baraf : तानसाच्या अभयारण्यात स्वत:सह बहिणीला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवणाऱ्या या हाली बरफला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानीत केलं आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे - बिबटय़ाच्या तोंडातून स्वत: सह बहिणीची सुटका करणारी हाली बरफ ही आदिवासी कन्या आठ वर्षापूवी केंद्र शासनाचा बाल शौर्य पुरस्कार विजेती आहे. आता ही हाली बरफ तीन बालकांची आई आहे. शहापूर तालुक्यातील रातांधळे येथे पतीसोबत आहे. मात्र सध्या ती फार हलाखीचे जीवन जगत आहे. शासनाच्या शिधावाटप दुकानावरील अन्नधान्यही तिला चार महिन्यांपासून मिळालेलं नाही. गावातील लाकडं फोडून ती कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.
तानसाच्या अभयारण्यात स्वत:सह बहिणीला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवणाऱ्या या हाली बरफला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानीत केलं आहे. स्वयंपाकासाठी सरपन आणण्यासाठी बहिणीसह ती जंगलात गेली होती. झुडपात दबाधरून बसलेल्या बिबटय़ाने तिच्या बहिणीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण क्षणाचाही विलंब न लावता हालीने दगडांचा मारा करून बिबटय़ाच्या तावडीतून बहिणीची सुटका करून जीव वाचवला होता. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने 2013 दरम्यान तिला बाल शौर्य पुरस्कारा देऊन सन्मानित केलेले आहे. पण आता तीन फार हालाखीचे जीवन जगत आहे.
बालकांसाठी आदर्श ठरलेली ही वीरबाला हाली बलफ सध्या तीन बालकांची आई आहे. आता ती हाली राम कुवर या नावाने ओळखली जात आहे. काही काळ तर तिला रेशनिंगकार्ड मिळालेले नव्हते. लोकमतसह श्रमजीव संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश खोडका यांनी तिची प्रशासनाकडे कैफियत मांडून, पाठपुरावा करून तिला अंत्योदय कार्ड प्राप्त करून दिले आहे. पण गेल्या चार महिन्यापासून त्यांवर अन्नधान्यही मिळालेले नसल्याचे वास्तव खोडका, यांनी प्रशासनाकडे मांडलेले आहे.
एवढेच नव्हे तर शहापूर येथील आदिवासी विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात रोजंदारीने काम करणाऱ्या हालीचा तो रोजगारही गेलेला आहे. कोरोनामुळे आश्रम शाळा, वसतीगृहच बंद असल्यामुळे तिचा रोजगार गेलेला आहे. गावातही फारसा कामधंदा नाही. गावकऱ्यांचे लाकडं फोडणाऱ्या पतीला ती आपल्या परीने मदत करीत आहे. जंगलातून लाकडांची मोळी आणून ती गावात देऊन त्यावर मिळणाऱ्या मोबदल्यावर सध्या ती तीन मुलांसह पतीचा उदरनिर्वाह करीत आहे. वेळप्रसंगी या परिवारास अर्धपोटी राहण्याचा प्रसंग ओढावलेला असल्याचे खोडका यांनी लोकमतला सांगितले.