'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर ठाण्यात राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:26 PM2018-01-19T16:26:16+5:302018-01-19T16:30:36+5:30
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात 'स्मार्ट सिटीज : द रोड अहेड' या विषयावर राष्ट्रीय परिषदचे उद्धघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांच्या संदेशाचे ध्वनिचित्रण सुरुवातीला दाखविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी परिषदेची तात्विक पृष्ठभूमी विशद केली. परिषदेच्या समन्वयिका प्रा. नीलम शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.
आपल्या बीजभाषणात पोपटराव पवार म्हणाले की गाव सोडून शहरात आल्यामुळे भारतात इंडिया, भारत ,इंडो भारत या तीन जमाती तयार झाल्या. महात्मा गांधीनी दिलेल्या "गावाकडे चला" या महत्वाच्या संदेशाचा दाखला देत पवार म्हणाले की गावाकडून शहरामध्ये स्थलांतरीत होणाऱ्या वाढत्या प्रमाणामुळे शहरांवर मोठा ताण येत आहे. शहरांना लागणाऱ्या वाढत्या पाण्यामुळे गावाकडील शेतीला पाणी मिळत नाही व म्हणूनच महागाई वाढते. निसर्गाची काळजी आपण तल्याशिवाय निसर्ग आपली काळजी घेणार नाही हा सल्ला त्यांनी दिला. हिवरे बाजार गावात सरपंच झाल्यानंतर केलेल्या विधायक कामांची माहिती देत ग्राम संसद, शाश्वत विकास-शाश्वत आनंद, जलसंधारण, पुतळा विरहित गाव, व्यसनमुक्ती, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी इत्यादी आदर्श योजना गावात आणून दुष्काळी उजाड गावचं नंदनवन फुलवतानाची कृतार्थ भावना पोपटराव पवारांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान व अध्यात्म यांची सांगड आपल्या लोकसंस्कृतीमध्ये होती,आपल्या सणवारांची योजना त्या रीतीने आपल्या पूर्वजांनी केली होती मात्र आधुनिकतेच्या नादात आपण निसर्गाला विसरत आहोत.
पुराणातील सगर राजांची गँगावतरणाची कथा सांगत सर्वात पहिली जलसंधारणाची योजना भगवान शिवांनी कैलास मानसरोवर येथे राबवली. 150 देशात पाण्यासाठी टोकाचा संघर्ष सुरू आहे , चीन , पाकिस्तान व भारत यांच्या संघर्षाच्या मुळाशी पाण्याची भेडसावणारी समस्या आहे. या समस्येवर विद्यार्थी दशेपासूनच आपण सजग व्हायला हवे, अशा अनेक उदबोधक गोष्टी सांगत उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.
शहरांनी पाणी वाचवायला शिकलं पाहिजे व गावांनी पाणी जिरवायला शिकलं पाहिजे हा संदेश पवारांनी दिला. विद्यार्थ्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या अभ्यास सक्रमाची नितांत गरज आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. महाविद्यालयात ने दत्तक घेतलेल्या शहापुर मधील टाकी पठार गावची पाहणी करण्यासाठी येण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता त्याचेही वाचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजा रॉय अब्राहम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा विमुक्ता राजे यांनी केला तर प्रा मृन्मयी थत्ते यांनी उपस्थितांचे अभार मानले.